छोट्या कार्यक्रमात परफॉर्मन्स आणि साध्या गाड्यांमधून प्रवास! गोविंदाने खरं काय ते सांगितलंच, म्हणाला- "देवाना मला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 14:05 IST2026-03-06T14:02:48+5:302026-03-06T14:05:04+5:30
उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील एका शालेय कार्यक्रमात गोविंदाने डान्स केला होता, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे अभिनेत्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता या सर्व टीकेवर गोविंदाने पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केलंय.

छोट्या कार्यक्रमात परफॉर्मन्स आणि साध्या गाड्यांमधून प्रवास! गोविंदाने खरं काय ते सांगितलंच, म्हणाला- "देवाना मला..."
९० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांना वेड लावणारा सुपरस्टार गोविंदा सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील एका शालेय कार्यक्रमात गोविंदाने डान्स केला होता, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर काही नेटकऱ्यांनी "सुपरस्टारवर ही काय वेळ आली?" अशा शब्दांत त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता या सर्व टीकेवर गोविंदाने पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केलंय.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने स्पष्ट केले की, सोशल मीडियावर ज्याला 'छोटा कार्यक्रम' म्हणून हिणवले जात आहे, तो प्रत्यक्षात अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम होता. गोविंदा म्हणाला, "ज्याला लोक छोटा शो म्हणत आहेत, त्यातील एक कार्यक्रम मुख्यमंत्र्यांचा होता आणि दुसरा एका खासदाराचा होता. लोक वस्तुस्थिती न तपासता सोशल मीडियावर काहीही हेडलाईन्स चालवतात."
आग्रा येथील एका दौऱ्यात गोविंदा साध्या गाड्यांमधून प्रवास करताना दिसला होता, त्यावरूनही त्याच्या आर्थिक स्थितीवर प्रश्न उपस्थित केले गेले. यावर स्पष्टीकरण देताना गोविंदा म्हणाला, "हा केवळ प्रोटोकॉलचा भाग होता. तिथे तुमच्या आलिशान मर्सिडीज गाड्या नेण्याची परवानगी नसते, त्या बाहेर ठेवाव्या लागतात. तिथल्या नियमांनुसार ज्या गाड्या उपलब्ध होत्या, त्यातूनच प्रवास करावा लागला. यात माझ्या लाइफस्टाइलशी कोणताही संबंध नाही."
गोविंदाने पुढे सांगितले की, "मी कधीही 'इगो'मध्ये राहिलो नाही. काम हे काम असते. जेव्हा लोक माझ्या गाड्यांबद्दल चर्चा करत होते, तेव्हा विमानात सहप्रवाशांनी माझे गाणे गाऊन माझे स्वागत केले होते. मला देवाने खूप काही दिले आहे आणि मी त्याबद्दल सदैव कृतज्ञ आहे. मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे," असे त्याने ठामपणे सांगितले. सध्या गोविंदा कोणत्याही मोठ्या चित्रपटात दिसत नसला तरी, विविध सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो.