'गोलमाल ५'ची शूटिंग सुरू, अक्षय कुमारची एन्ट्री, शर्मन जोशी परतला; पाहा सेटवरील मजेशीर व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 12:24 IST2026-03-16T12:16:55+5:302026-03-16T12:24:53+5:30
रोहित शेट्टीचं चाहत्यांना मोठं सरप्राइज! 'गोलमाल ५'ची अधिकृत घोषणा करत शेअर केला मजेशीर व्हिडीओ

'गोलमाल ५'ची शूटिंग सुरू, अक्षय कुमारची एन्ट्री, शर्मन जोशी परतला; पाहा सेटवरील मजेशीर व्हिडीओ
Rohit Shetty Golmal 5 Shooting Start : गोलमाल है भाई सब गोलमाल है… हे ऐकलं की आपल्यापैकी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुटतं. अजय देवगण, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू ,तुषार कपूर यांच्या भन्नाट अभिनयाने आणि कॉमेडीने लोकांना पोट दुखेस्तोवर हसवलं. त्यामुळेच चाहते या चित्रपटाच्या नव्या भागाची आतुरतेने वाट बघत असतात. आता परत एकदा अजय देवगण आणि त्याची पलटन आपल्याला सर्वांना हसवण्यासाठी येत आहे. पण, यावळी त्यांच्या पलटनमध्ये खिलाडी कुमार अक्षयचीही एन्ट्री झाली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीनं आपला ५२ व्या वाढदिवसाच्या निमित्तानं चाहत्यांना मोठं सरप्राइज दिलं आहे.
रोहित शेट्टीनं आपल्या सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या गोलमानल फ्रँचायझीतील पुढचा भाग 'गोलमाल ५'ची अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेसोबत त्यानं सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ आणि भावनिक नोटही शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटातील प्रमुख कलाकारांची झलक पाहायला मिळतेय. यात अजय देवगण, अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे आणि कुणाल खेमू दिसत आहेत. व्हिडीओच्या शेवटी संपूर्ण कलाकार एकत्र येतात आणि तेव्हा मोठ्या सरप्राइजची चर्चा सुरू होते. त्याच वेळी पहिल्या चित्रपटाचा भाग असलेले शर्मन जोशीची एन्ट्री होते. सुरुवातीला तेच सरप्राइज असल्याचं वाटत असताना खरा धक्का त्यानंतर मिळतो.
'गोलमाल ५'मध्ये आता अक्षय कुमारचीही एन्ट्री झाली आहे. व्हिडीओच्या शेवटी अक्षय कुमार एका वेगळ्याच लूकमध्ये दिसतो. त्याचा हा वेगळा अवतार पाहून अजय देवगण आणि रोहित शेट्टी हसताना दिसतात. अक्षय कुमारची नवीकोरी एन्ट्री आणि शर्मन जोशीच्या कमबॅकमुळं 'गोलमाल ५' अधिक रंजक होणार आहे.
रोहित शेट्टीनं पोस्टमध्ये लिहिले की, "२० वर्षांपूर्वी पहिला 'गोलमाल' चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटाने माझं आयुष्य बदललं. गेल्या दोन दशकांत आम्ही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. कधी कधी तुम्हाला निराशही केलं असेल, पण आम्ही नेहमी प्रामाणिकपणे काम केलं. आता पुन्हा एकदा माझी टीम आणि मी 'गोलमाल'च्या पुढील भागाच्या शूटिंगसह नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोत".
'गोलमाल'या फ्रँचायझीची सुरुवात २००६ मध्ये झाली होती. त्यानंतर 'गोलमाल रिटर्न्स' , 'गोलमाल ३' , 'गोलमाल अगेन' असे चित्रपट प्रदर्शित झाले आणि सर्वांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता 'गोलमाल ५'च्या शूटिंगला सुरुवात झाली असून हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की, २० वर्षांपूर्वीच्या या सुपरहिट कॉमेडी फ्रँचायझीचा पाचवा भाग प्रेक्षकांना किती हसवण्यात यशस्वी होतो.