'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:22 IST2025-07-14T12:21:33+5:302025-07-14T12:22:16+5:30
आरसीबी संघ १८ वर्षांनंतर जिंकला त्यावर काही दिवसांपूर्वी जिनिलियाने प्रतिक्रिया दिली.

'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
साऊथ तसंच हिंदी सिनेमांमधून अभिनेत्री जिनिलिया डिसुझाने (Genelia Dsouza)) आपल्या अभिनयाने सर्वांचं मन जिंकलं होतं. नंतर रितेश देशमुखशी लग्न झाल्यानंतर ती संसारात व्यस्त झाली. तिने दोन मुलांना जन्म दिला. मुलांसाठी वेळ द्यायचा म्हणून ती फारशी सिनेमांमध्ये दिसली नाही. जिनिलिया आणि रितेशचा त्यांच्या मुलांसोबत खूप छान बॉन्ड आहे जो अनेकदा व्हिडिओंमधून दिसून येतो. ते चौघंही कधी फुटबॉल तर कधी क्रिकेटची मॅच एन्जॉय करताना दिसतात. विराट कोहलीचा (Virat Kohli) आरसीबी संघ १८ वर्षांनंतर जिंकला त्यावर काही दिवसांपूर्वी जिनिलियाने प्रतिक्रिया दिली.
'फिल्मीग्यान'ला दिलेल्या मुलाखतीत जिनिलिया म्हणाली, "माझी मुलं फुटबॉल आणि क्रिकेटचे चाहते आहेत. एकूणच ते स्पोर्ट फॅन्स आहेत. त्यामुळे आमच्याकडे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून क्रिकेट मॅच पाहतात. आरसीबी जिंकली तेव्हाही आम्ही मुलांसोबत तेवढा वेळ जागं राहून सामना पाहिला होता."
ती पुढे म्हणाली, "विराटला १८ वर्षांनी जिंकताना पाहून खूप भारी वाटलं. टीमवर्क खूप महत्वाची असते. तेच आरसीबी फायनलमध्येही आपण पाहिलं. तो असा क्षण होता जो पाहून चाहते म्हणून आपल्याही मनात तशीच भावना होती. मॅच जिंकल्यानंतरही जेव्हा विराट एबी डिव्हीलर्स, ख्रिस गेलकडे गेला आणि म्हणाला की या लोकांनीही १८ वर्ष लढा दिला ते खूप स्पेशल होतं."
विराट कोहली आणि जिनिलिया काही वर्षांपूर्वी एका जाहिरातीत एकत्र दिसले होते. अनेकदा त्यांच्या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. जिनिलिया खूप क्यूट आहे, तिला क्रिकेट खेळताना पाहायला आवडेल असंही विराट कोहली एकदा म्हणाला होता.