'ओ रोमिओ'चा टीझर पाहून फरिदा जलाल यांच्याच डायलॉगची चर्चा; म्हणाल्या, "मी शिवी दिली कारण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:37 IST2026-01-13T13:37:19+5:302026-01-13T13:37:47+5:30
विशाल भारद्वाज यांच्या आगामी 'ओ रोमिओ'मध्ये कलाकारांची फौजच आहे. दरम्यान टीझर पाहून फरिदा जलाल यांच्याच डायलॉगची चर्चा सुरु आहे.

'ओ रोमिओ'चा टीझर पाहून फरिदा जलाल यांच्याच डायलॉगची चर्चा; म्हणाल्या, "मी शिवी दिली कारण..."
शाहीद कपूरच्या बहुप्रतिक्षित 'ओ रोमिओ' चा टीझर नुकताच आला. शाहिद आणि विशाल भारद्वाज या कॉम्बिनेशनचा वेगळाच चाहतावर्ग आहे.'कमिने', 'हैदर' या सिनेमांमधून त्याचा प्रत्यय आला आहे. आता चाहत्यांमध्ये 'ओ रोमिओ'ची उत्सुकता आहे. सिनेमात शाहिदसोबतच इतरही अनेक कलाकार आहेत. नाना पाटेकर, फरिदा जलाल, विक्रांत मेस्सी, तमन्ना, दिशा पाटनी, अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी यांची झलक टीझरमध्ये दिसली. तसंच शाहिदच्या स्वॅगने लक्ष वेधून घेतलंच शिवाय फरिदा जलाल यांचा डायलॉग मात्र जोरदार व्हायरल होतोय. यात त्यांनी चक्क शिवी दिली आहे. ज्यांना साध्या सोज्वळ भूमिकेत पाहिलं त्या फरिदा जलाल यांच्या तोंडून शिवी ऐकल्यावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. आता यावर फरिदा जलाल यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.
टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत फरीदा जलाल म्हणाल्या, "विशाल भारद्वाज यांच्यासोबत काम करण्याची माझी आधीपासून इच्छा होती. भन्साळींसोबत काम केल्यानंतर मला विशाल सोबतही काम करायचं होतं. जेव्हा विशाल मला भेटायला आले तेव्हा मी हे त्यांना सांगितलं. त्यांनी मला ओ रोमिओची ऑफर दिली आणि मी स्क्रीनवर शिव्या देऊ शकेन का? असं विचारलं. मी चकितच झाले. मला कोणीतरी हे विचारेल असं कोणालातरी वाटेल का? मला कळलं नाही मी काय बोलू. मला विशालसोबत काम तर करायचंच होतं. त्यामुळे आता मी असं तर म्हणून शकत नव्हते की मी शिव्या देऊ शकणार नाही त्यामुळे मी काम करणार नाही. मग मी त्याला म्हणाले की,'मी अश्लील आणि घाणेरड्या शिव्या देणार नाही. म्हणजे मी छोट्या मोठ्या, बेसिक शिव्या देऊ शकते. पण मी आईबहिणीच्या शिव्या देणार नाही.' हे ऐकून विशालला हसूच आलं आणि मला काय म्हणायचंय हे त्याला नीट समजलं."
त्या पुढे म्हणाल्या, "हा डायलॉग कथेत खरोखर गरजेचाच होता. सोशल मीडियावर सगळे मला विचारत आहेत की मी असं कसं करु शकते? आमच्या प्रेमळ आजीने शिवी कशी दिली? जे मला लहानपणापासून पाहत आहेत त्यांना माझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी नेहमीच अशा संवादांपासून स्वत:ला दूर ठेवले आहे पण काही हरकत नाही. जेव्हा प्रेक्षक सिनेमा बघतील आणि माझी भूमिका त्यांना समजेल तेव्हा त्यांना माझ्या डायलॉगचं कारण काय होतं याचा अंदाज येईल. जर तुम्ही एखादी भूमिका स्वीकारता तर ती निभावण्याची जबाबदारीही तुमचीच असते."