पुण्यतिथी विशेष : नूतनने आईलाच खेचले होते कोर्टात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 12:02 IST2017-02-21T06:32:51+5:302017-02-21T12:02:51+5:30

अभिनेत्री नूतन आज आपल्यात नाही. मात्र सिनेप्रेमींच्या मनात नूतन कायम जिवंत असणार आहे. नूतनची आज(२१ फेबु्रवारी) पुण्यतिथी. यानिमित्त जाणून ...

Exclusive: Nutan had pulled mother in court! | पुण्यतिथी विशेष : नूतनने आईलाच खेचले होते कोर्टात!

पुण्यतिथी विशेष : नूतनने आईलाच खेचले होते कोर्टात!

िनेत्री नूतन आज आपल्यात नाही. मात्र सिनेप्रेमींच्या मनात नूतन कायम जिवंत असणार आहे. नूतनची आज(२१ फेबु्रवारी) पुण्यतिथी. यानिमित्त जाणून घेऊ यात, नूतनचा मिस इंडिया ते बॉलिवूड अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास....



नूतनचे खरे नाव नूतन समर्थ असे होते. नूतनला घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला होता. पण तरिही अभिनेत्री बनण्यापर्यंतचा नूतनचा प्रवास सोपा मात्र नव्हता. नूतनने ‘नल दमयंती’ या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केले होते. यानंतर स्वत:कडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तिने ‘मिस इंडिया’ सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला. ‘मिस इंडिया’चा किताब नूतनने जिंकला. पण तरिही चित्रपटसृष्टीने तिची दखल घेतली नाही. शेवटी नूतनची आई शोभना समर्थ हिनेच आपल्या मुलीला ‘हमारी बेटी’ या चित्रपटातून लॉन्च केले.



यानंतर मात्र नूतनने कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘हमलोग’,‘नगीना’ सारख्या काही चित्रपटांत नूतन दिसली. पण या चित्रपटांनी नूतनला फार यश दिले नाही.१९५५ मध्ये ‘सीमा’ या चित्रपटाने नूतनला खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी नूतनला तिच्या सिने करिअरमधील पहिला फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. 



१९५८ मध्ये ‘सोने की चिडिया’ हिट झाला आणि नूतन आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाऊ लागली. १९६९मध्ये प्रदर्शित ‘सुजाता’ या चित्रपटाने नूतनला दुसरा फिल्म फेअर पुरस्कार मिळवून दिला. १९६३ मध्ये प्रदर्शित ‘बंदिनी’ या चित्रपटातील नूतनचा अभिनय कायम स्मरणात राहिली. ‘बंदिनी’ आणि ‘दिल ने फिर याद किया’ यासारख्या चित्रपटानंतर नूतन ‘ट्रेजेडी क्विन’ म्हणून ओळखली जाऊ लागली. नूतन केवळ दु:खी भूमिकाच करते, असे तिच्याबद्दल बोलले जाऊ लागले. पण ‘छलिया’ आणि ‘सूरत’ यासारख्या चित्रपटांतून कॉमिक अभिनय साकारून नूतनने सगळ्यांची बोलती बंद केली. १९६५ ते १९६९ पर्यंत नूतनने दाक्षिणात्य निर्मात्यांच्या चित्रपटांत काम केले. यात बहुतांश सामाजिक आणि कौटुंबिक चित्रपटांचा समावेश् होता. यातील ‘गौरी’,‘मेहरबान’,‘मिलन’ आणि ‘भाई-बहन’ यासारखे चित्रपट सुपरहिट ठरलेत.



१९ आक्टोबर १९५९ रोजी नूतनने ले. कमांडर रजनीश बहल यांच्याशी विवाह केला. नूतनचा मुलगा मोहनीश बहल हा सुद्धा चित्रपटांत काम करतो. नूतनची बहीण तनूजा आणि भाची काजोल यांचे नावही आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते.



नूतन दोन घटनांमुळे चर्चेत आली. सर्वप्रथम आपल्या बँक खात्यातील अफरातफरीसाठी तिने आपल्या आईला जबाबदार ठरवले. इतकेच नाही तर आईला तिने कोर्टात खेचले. यामुळे आई व मुलीच्या नात्यात अनेक वर्षे मोठी दरी निर्माण झाली. मात्र १९८३ मध्ये पुन्हा आईने नूतनला जवळ केले. चित्रपटसृष्टीत शिखरावर असताना नूतनचे नाव अभिनेता संजीव कुमार यांच्यासोबत जोडले जाऊ लागले. याबद्दल संजीव कुमार यांना विचारले असता, मी नूतनवर पे्रम करतो, असे त्याने सांगितले. हे ऐकून नूतनने सगळ्यांदेखत संजीव कुमार यांच्या थोबाडीत मारली होती. यामुळे नूतन चांगलीच चर्चेत आली होती.



हिंदी चित्रपटात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त करण्याचा विक्रम नूतन आणि काजोल  या दोघींच्या नावावर संयुक्तपणे नोंदवला गेला आहे. नूतनने आपल्या सिने करिअरमध्ये सहा फिल्म फेअर पुरस्कार पटकावले. नूतन केवळ एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच नव्हती तर गीत आणि गझल लिहिण्याचा तिला छंद होता.



सुमारे चार दशके आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना रिझवणारी नूतन २१ फेब्रुवारी १९९१ मध्ये काळाच्या पडद्याआड गेली.

Web Title: Exclusive: Nutan had pulled mother in court!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.