"त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण...", सलमानची रुमर्ड गर्लफ्रेंड युलिया वंतूरचं वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 13:29 IST2025-12-08T13:28:35+5:302025-12-08T13:29:41+5:30
Iulia Vantur on Salman Khan family: सलमान खानची खास मैत्रीण आणि रोमानियन गायिका युलिया वंतूरने अभिनेता दीपक तिजोरीसोबत 'इकोज ऑफ अस' या शॉर्ट ड्रामाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. नुकतेच तिने दीपक तिजोरीसोबतचा अनुभव, सलमान खानच्या कुटुंबासोबतचे तिचे नाते आणि आगामी प्रोजेक्ट्सबद्दल खास चर्चा केली.

"त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण...", सलमानची रुमर्ड गर्लफ्रेंड युलिया वंतूरचं वक्तव्य चर्चेत
सलमान खानची खास मैत्रीण आणि रोमानियन गायिका युलिया वंतूरने अभिनेता दीपक तिजोरीसोबत 'इकोज ऑफ अस' या शॉर्ट ड्रामाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. नुकतीच युलियाने आयएएनएसशी (IANS) संवाद साधला. यावेळी तिने दीपक तिजोरीसोबतचा अनुभव, सलमान खानच्या कुटुंबासोबतचे तिचे नाते आणि आगामी प्रोजेक्ट्सबद्दल खास चर्चा केली.
युलिया वंतूर म्हणाली, "दीपक तिजोरी खूप चांगले व्यक्ती आणि उत्कृष्ट अभिनेता आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. 'इकोज ऑफ अस'मधील एक प्रेमगीत तिने एका भारतीय गायकासोबत गायले आहे. माझी आणखी बरीच गाणी रिलीज व्हायची आहेत."
सलमान खानच्या फॅमिलीबद्दल युलिया म्हणाली...
नुकताच युलियाने सलमान खानचे वडील सलीम खान यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या होत्या. ती म्हणाली, "सलीम साहेब खूप दमदार व्यक्ती आहेत. त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण काहीतरी शिकवतो. माझे स्वतःचे कुटुंब दूर आहे, म्हणून ते माझ्यासाठी कुटुंबासारखेच आहेत."
युलियाला या गोष्टीचा होतोय पश्चाताप?
जेव्हा आयएएनएसने तिला विचारले, "रोमानियातील यशस्वी करिअर सोडल्याबद्दल तुम्हाला पश्चात्ताप होतो का?", या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली, "मी माझ्या आयुष्यातून हे सगळं अजिबातही सोडणार नाही, कारण कोणताही नवीन देश तुम्हाला तुमच्या 'सेफ झोन'मधून बाहेर काढतो. तुम्हाला स्वतःची नव्याने ओळख निर्माण करावी लागते. मी मान्य करते की रोमानियामध्ये माझे एक यशस्वी करिअर होते. मी तिथे अनेक कामे केली आहेत, पण आयुष्याने मला नवीन मार्ग दिला. नवीन भाषेत गाणी म्हणणे, परफॉर्म करणे आणि रेकॉर्डिंग करणे. गायन हेच माझे खरे पॅशन आहे, हे मला जाणवले."
युलिया पुढे म्हणाली, "प्रत्येक भाषेचा एक वेगळा आत्मा असतो. संगीत हे संस्कृतीचे मूळ आहे. भारतीय संगीत माझ्यासाठी इंद्रधनुष्यासारखे आहे. ते रंग, सूर आणि भावनांनी भरलेले आहे. हिंदी संगीत शिकल्यामुळे मी एक व्यक्ती म्हणून समृद्ध झाले आहे." पोपसमोर गायलेले गाणे परफॉर्मन्स होते की प्रार्थना, असे विचारल्यावर यूलिया म्हणाली, "खरं सांगायचं तर ते तिन्ही होते, परफॉर्मन्स, संस्कृतीचे दर्शन आणि प्रार्थना देखील."