"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:02 IST2025-12-27T13:01:24+5:302025-12-27T13:02:27+5:30
'दृश्यम ३'मधून अक्षय खन्ना तडकाफडकी बाहेर पडला. पण आता निर्मात्यांनी अक्षयच्या वागणुकीवर टीका करुन त्याचा बेजबाबदार स्वभाव समोर आणला आहे

"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
'दृश्यम ३' मधील अक्षय खन्नाच्या तडकाफडकी एक्झिटमुळे केवळ चाहतेच नाही, तर चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक देखील प्रचंड संतापले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अक्षय खन्नावर अत्यंत गंभीर आरोप केले असून, अक्षयचा स्वभाव 'बेजबाबदार' आहे, असे म्हटले आहे. कुमार मंगत यांनी असा दावा केला आहे की, अक्षयच्या या वागण्यामुळे ते आता कायदेशीर नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहेत.
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत कुमार पाठक यांनी सविस्तर खुलासा केला आहे. अक्षयने 'धुरंधर' आणि 'छावा' या चित्रपटांच्या यशानंतर त्याचे मानधन २१ कोटी रुपये इतके वाढवले आहे. मात्र, निर्माते कुमार मंगत यांनी वेगळाच खुलासा केला आहे. त्यांच्या मते, अक्षयने मागितलेले मानधन देण्यास ते तयार होते आणि त्याला सिनेमासाठी करारबद्धही करण्यात आले होते. मात्र, खऱ्या वादाचे कारण अक्षयचा विग वापरण्याचा हट्ट आहे.
निर्मात्यांनी सांगितले की, 'दृश्यम ३' ची कथा दुसऱ्या भागाच्या कथेपासून फक्त ६ तासांच्या फरकाने पुढे सरकते. 'दृश्यम २'मध्ये अक्षय खन्नाचा लुक टक्कल असलेला होता. अशा परिस्थितीत ६ तासांनंतरच्या कथेत अक्षयच्या डोक्यावर केस दाखवण्यात कोणतेच लॉजिक नव्हते. मात्र, अक्षयने सातत्याने विग वापरण्याची मागणी केली, जी दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी फेटाळून लावली.
निर्मात्यांच्या मते, अक्षयच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याला असे पटवून दिले की 'धुरंधर'मधील अक्षयचा केसांचा लुक प्रेक्षकांना आवडला आहे, त्यामुळे त्याने तोच लुक कायम ठेवावा. अक्षयला वाटतेय की, धुरंधर त्याच्यामुळे चालतोय. पण सिनेमा चालण्याची अनेक कारणं असतात. फक्त एका व्यक्तीमुळे कधीच कोणता सिनेमा चालत नाही. जर कोणी फक्त अक्षयला घेऊन एखादा सिनेमा केला तर तो सिनेमा ५० कोटीही कमवू शकणार नाही.
कुमार मंगत अक्षयवर टीका करताना म्हणाले की, "जेव्हा आम्ही अक्षयसोबत 'सेक्शन ३७५' केला, तेव्हा त्याच्याकडे चार वर्षे काम नव्हते. 'दृश्यम २' नंतर आम्ही त्याला सांगितले होते की, त्याच्यासाठी खास भूमिका लिहिल्या जातील. आम्ही चांगले मित्र होतो, तो दर महिन्याला आमच्या ऑफिसमध्ये जेवायला यायचा. पण आता यश त्याच्या डोक्यात गेले आहे."
शूटिंग सुरू व्हायला अवघे १० दिवस बाकी असताना आणि वेशभूषाकारांना पैसे देऊन काम सुरू झालेले असताना, अक्षयने केवळ एका मेसेजवर 'दृश्यम ३' चित्रपट सोडल्याचे निर्मात्यांनी सांगितले. अक्षयने फोन उचलणेही बंद केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व वादामुळे 'दृश्यम ३'च्या टीमला आता मोठे नुकसान सहन करावे लागत असून, जयदीप अहलावतसोबत तातडीने शूटिंगचे नियोजन करावे लागत आहे.