दीपिका चिखलिया यांनाही होती 'रामायणम्'ची ऑफर? म्हणाल्या, "कधीच करणार नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 13:25 IST2025-07-04T13:25:00+5:302025-07-04T13:25:31+5:30
मी एकदा रामायण मध्ये सीतेची भूमिका केली आहे. त्यामुळे आता...

दीपिका चिखलिया यांनाही होती 'रामायणम्'ची ऑफर? म्हणाल्या, "कधीच करणार नाही..."
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayan) सिनेमाची पहिली झलक काल समोर आली. हा सिनेमा तुफान हिट होणार अशीच अनेकांनी प्रतिक्रिया दिली. नमित मल्होत्रा यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. काही वर्षांपूर्वी रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. मालिकेत अरुण गोविल प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत होते. तर दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) यांनी माता सीतेची भूमिका साकारली. आता 'रामायणम्' सिनेमात अरुण गोविल दशरथाच्या भूमिकेत आहेत. दीपिका यांनी नुकतंच सिनेमावर भाष्य केलं.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दीपिका चिखलिया म्हणाल्या, "मला रामायणम् साठी विचारलं गेलं नाही. मला कोणतीही भूमिका ऑफर झाली नाही. मला वाटतं त्यांचा मला ऑफर देण्याचा विचारही नसेल. मी एकदा रामायण मध्ये सीतेची भूमिका केली आहे. त्यामुळे आता मी रामायण मध्ये वेगळी कोणतीही भूमिका साकारु शकत नाही. मला याबद्दल अजिबातच खात्री नाही. जर मला महाभारत किंवा शिव पुराणात काही भूमिका करण्याची संधी मिळाली तर मी त्याबद्दल विचार करु शकेन. पण 'रामायणम्' सिनेमात काम करण्याचा मी विचारही करु शकत नाही."
दीपिका चिखलिया यांना सर्व लोक माता सीतेच्या भूमिकेमुळेच ओळखतात. मालिकेवेळी लोकांना खरोखरंच अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया हे श्रीराम आणि सीता वाटायचे. अनेक जण तर त्यांच्या पायाही पडायचे इतकं त्यांना ते खरं वाटलं होतं. आजही त्यांना लोकांकडून तोच सम्मान मिळतो. आता नितेश तिवारींचा 'रामायण' सिनेमा किती कमाल दाखवेल हे पाहणं महत्वाचं आहे.
दोन वर्षांपूर्वी 'आदिपुरुष'हा सिनेमाही आला होता. ओम राऊतने याचं दिग्दर्शन केलं होतं. प्रभास प्रभू श्रीराम तर कृती सेनन माता सीतेच्या भूमिकेत होती. सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत होता. सिनेमातील संवाद आणि व्हीएफएक्स मुळे सिनेमा प्रचंड ट्रोल झाला होता.