डिनो मोरियाला पितृ शोक, वडिलांच्या आठवणीत भावुक झाला अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:32 IST2025-12-17T17:31:51+5:302025-12-17T17:32:51+5:30
Dino Morea Father Passed Away : बॉलिवूडमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेता डिनो मोरिया याच्या वडिलांचे निधन झाले आहे.

डिनो मोरियाला पितृ शोक, वडिलांच्या आठवणीत भावुक झाला अभिनेता
बॉलिवूडमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेता डिनो मोरिया (Dino Morea) याच्या वडिलांचे निधन झाले आहे. डिनो मोरियाचे वडील रॉनी मोरिया (Ronnie Morea) यांनी जगाचा निरोप घेतला आहे. खुद्द डिनो मोरियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
वडिलांच्या निधनानंतर डिनो मोरियाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने वडिलांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. डिनो मोरियाने लिहिले की, "प्रत्येक दिवस भरभरून जगा, रोज हसा, जे काही कराल ते पूर्ण आवडीने आणि जिद्दीने करा. व्यायाम करा, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा, उन्हाचा आनंद घ्या, चांगले जेवण जेवा, डोंगर चढायला जा, समुद्रात पोहायला जा आणि जंगलात फिरा. मेहनत करा, चांगले वागा, दयाळू बना आणि सर्वांवर प्रेम करा... आणि हे सर्व आपल्या स्वतःच्या अटींवर करा! ही यादी खूप मोठी आहे. माझ्यासाठी या सर्व गोष्टींचे उत्तम उदाहरण म्हणजे दुसरे कोणी नसून माझे मार्गदर्शक, माझे हिरो, माझे वडील... माझे डॅड!! बाबा, आयुष्यातील हे सर्व धडे शिकवल्याबद्दल तुमचे आभार! आम्ही सर्वजण तुम्हाला खूप मिस करू. मला खात्री आहे की, तुम्ही स्वर्गलोकात कुठेतरी पार्टी सुरू केली असेल आणि तुमच्या आजूबाजूचे सर्व लोक नाचत-गाजत असतील आणि खूप हसत-खिदळत असतील. जोपर्यंत आपण पुन्हा भेटत नाही, तोपर्यंत तुम्ही असेच 'कूल' राहा! लव्ह यू."
सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली
या पोस्टसोबत डिनोने वडिलांच्या तरुणपणातील काही जुने फोटो देखील शेअर केले आहेत. डिनोच्या या पोस्टवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. मलायका अरोरा, अमृता अरोरा, संध्या मृदुल, विशाल दाडलानी आणि चंकी पांडे यांसारख्या अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, डिनो मोरियाची एक्स-गर्लफ्रेंड बिपाशा बासू हिने देखील त्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.