बॉलिवूडचा 'हा' सुपरस्टार दिवाळी साजरी करत नाही, व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:42 IST2025-10-20T12:35:26+5:302025-10-20T12:42:49+5:30
अभिनेत्याने एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे.

बॉलिवूडचा 'हा' सुपरस्टार दिवाळी साजरी करत नाही, व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण
दिवाळी (Diwali 2025) हा आनंद, प्रकाश आणि संपत्तीचा सण म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण देशभरात सध्या दिवाळीच्या उत्साहाचे वातावरण आहे. घराघरात दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि नवीन कपड्यांची खरेदीची लगबग सुरू आहे. बॉलिवूडमध्ये दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय. पण, या सगळ्यात पंजाबी सुपरस्टार आणि बॉलिवूड अभिनेता दिलजीत दोसांझ मात्र दिवाळी साजरी करत नाही. याचा खुलासा त्याने स्वत:च केलाय.
'टीम दिलजीत ग्लोबल' या इन्स्टाग्राम पेजवर एक भावनिक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्यानं दिवाळीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि तो हा सण का साजरा करत नाही, यामागचे कारण सांगितले आहे. दिलजीत म्हणाला, "मी खूप फटाके फोडायचो. दिवाळी हा माझा आवडता सण होता. आमच्या घरी महिनाभर आधीच तयारी सुरू करायचो. हे उत्सव रात्री उशिरापर्यंत चालू असायचे. इतकेच नाही, तर जर माझ्याकडचे फटाके संपले, तर इतरांकडून उधार घेऊन मी ते फोडायचो. दिवाळीचा उत्साह खूप होता".
मात्र, एक काळ असा आला, जेव्हा दिलजीतने दिवाळी साजरी करणे पूर्णपणे थांबवले. यामागचे कारणही त्याने स्पष्ट केले. तो म्हणाला, "जेव्हा मी माझ्या कुटुंबापासून वेगळे झालो, तेव्हा मी दिवाळी साजरी करणे बंद केले. मी दुःखी झालो. मी पुन्हा कधीही दिवाळी साजरी केली नाही". या बदलामुळे आता त्याला फटाक्यांच्या मोठ्या आवाजाचीही भीती वाटते.
आई-वडिलांपासून कसा दुरावला?
दिलजीत दोसांझ 'द रणवीर शो' शोमध्ये म्हणाला होता की, "मी ११ वर्षांचा होता. जेव्हा मी घर सोडलं आणि माझ्या मामासोबत राहायला लागलो. माझं गाव सोडून मी शहरात आलो होतो. मी लुधियानाला शिफ्ट झालो. माझ्या मामानं सांगितलं की याला माझ्यासोबत शहरात पाठवा आणि माझे आई-वडील म्हणाले हो, घेऊन जा. माझ्या आई-वडिलांनी मला एकदाही विचारलं देखील नाही. एका छोट्या रुममध्ये मी एकटा झोपायचो. मी फक्त शाळेत जायचो आणि परत यायचो. तिथे कोणताही टिव्ही नव्हता. माझ्याकडे खूप वेळ होता. तेव्हा आमच्याकडे फोन देखील नव्हता. जर मला घरी फोन करायचा असेल किंवा माझ्या आई-वडिलांचा फोन आला तर त्यासाठी देखील पैसे लागायचे. यानंतर माझे कुटुंबासोबतचे संबंध बिघडले".