एअर फोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिलजीत दोसांझ, 'बॉर्डर २'मधून अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आउट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:52 IST2025-12-01T13:51:18+5:302025-12-01T13:52:06+5:30
दिलजीत दोसांझने सोशल मीडियावर 'बॉर्डर २'चा पहिला व्हिडीओ शेअर केला आहे.

एअर फोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिलजीत दोसांझ, 'बॉर्डर २'मधून अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आउट
देशभक्तीपर सिनेमांची नावं घ्यायची तर 'बॉर्डर'चं नाव येतंच. १९९७ साली हा सिनेमा आला होता. आता 'बॉर्डर २'ची चर्चा आहे. येत्या काही महिन्यात सिनेमा भेटीला येणरा आहे. वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ आणि सनी देओल यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. 'बॉर्डर २'मधून दिलजीत दोसांझचा फर्स्ट लूक रिव्हील करण्यात आला आहे. त्याचा लूक पाहून चाहते सिनेमा पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
दिलजीत दोसांझने सोशल मीडियावर 'बॉर्डर २'चा पहिला लूक शेअर केला आहे. या व्हिडीओत बॅकग्राऊंडला 'संदेसे आते है' या बॉर्डरच्या गाजलेल्या गाण्याचं म्युझिक आहे. तर दिलजीत दोसांझ एअर फोर्स युनिफॉर्ममध्ये चालत येत आहे. यासोबत त्याने लिहिले, 'इस देश के आसमान मे गुरु के बाज पेहरा देते है'. सिनेमा पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे.
दिलजीतच्या चाहत्यांनी यावर कमेंट करत त्याच्या लूकवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 'पाजी,एअर फोर्स के युनिफॉर्म मे कितने अच्छे लग रहे हो', 'आपको देखकर लग रहा है की भारत मां पर कोई गलत आँखे नही उठा सकता है' अशा कमेंट्स आल्या आहेत.
अभिनयाबरोबर दिलजीत सिनेमासाठी गाणं देखील गाणार आहे. 'बॉर्डर २'मध्ये तो भारतीय हवाई दलाचे अधिकारी निर्मलजीत सिंग सेखोन यांची भूमिकेत दिसणार आहे. त्यांना भारत-पाकिस्तान युद्धात त्यांच्या शौर्यासाठी मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच बॉर्डर- २ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला जाण्याची शक्यता आहे. तसंच 'संदेसे येते हैं' या देशभक्तीपर गाण्याचं रिक्रेएटेड व्हर्जन बनवण्यासाठी काम करण्यात येत आहे. या गाण्यासाठी सोनू निगम आणि अरिजीत सिंग यांचा आवाज देण्यात आला आहे. आता असं म्हटलं जातंय की या कोलॅबरेशनमध्ये दिलजीत दोसांझचीही एन्ट्री झाली आहे.सोनू निगम, अरिजीत सिंग यांच्याबरोबर दिलजीतही आपली सुरांची जादू दाखवणार आहे.