"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 12:57 IST2025-11-15T12:55:41+5:302025-11-15T12:57:53+5:30
पापाराझींना पाहताच रोहित शेट्टीने उघड नाराजी व्यक्त केली. काय म्हणाला? जाणून घ्या

"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून गंभीर होती. त्यांना काहीच दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ते सध्या घरी उपचार घेत आहेत. अशा कठीण परिस्थितीत, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत पापाराझींना त्यांच्या घराबाहेरुन जाण्याची विनंती केली.
'बिग बॉस'च्या रोहित वैतागला
रोहित शेट्टी 'बिग बॉस १९' (Bigg Boss 19) च्या सेटवर गेला होता. यावेळी सलमान खानऐवजी रोहितने शोचे सूत्रसंचालन केले. सेटवर उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सना पाहताच रोहित शेट्टीने त्यांच्याशी संवाद साधला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, रोहित शेट्टी पापाराजींना विचारताना दिसत आहेत, "अरे, तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन गेलात की नाही?'' यावर उपस्थित एका फोटोग्राफरने त्यांना सांगितले की, आता आम्ही त्यांच्या घराबाहेर थांबलेलो नाही. रोहित शेट्टीच्या चेहऱ्यावर धर्मेंद्र यांच्या आरोग्याची चिंता स्पष्टपणे दिसत होती.
सनी देओल यांनीही व्यक्त केला होता संताप
रोहित शेट्टीने पापाराजींना केलेल्या विनंतीच्या दोन दिवसांपूर्वीच, अभिनेता सनी देओलने सुद्धा फोटोग्राफर्सवर संताप व्यक्त केला होता. गुरुवारी सकाळी फोटोग्राफर्सची गर्दी पाहून सनी देओल खूपच अस्वस्थ झाला आणि त्याने हात जोडून त्यांना विनंती केली, "तुमच्या घरात आई-वडील आहेत. तुमची मुलं आहेत, तुम्हाला लाज नाही वाटत?"
धर्मेंद्र यांना १२ नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी ११ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक निवेदन जारी करून धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले होते.