'धुरंधर: द रिव्हेंज'च्या ओटीटी रिलीजची तारीख ठरली? नेटफ्लिक्स नाही तर आता 'या' प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 11:50 IST2026-04-10T11:50:26+5:302026-04-10T11:50:45+5:30
'धुरंधर'चा पहिला भाग 'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित झाला होता, मात्र दुसरा भाग हा 'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित होणार नाही.

'धुरंधर: द रिव्हेंज'च्या ओटीटी रिलीजची तारीख ठरली? नेटफ्लिक्स नाही तर आता 'या' प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
Dhurandhar The Revenge on OTT : बॉक्स ऑफिसवर १६०० कोटींहून अधिक कमाई करून भारतीय सिनेसृष्टीत इतिहास रचणारा 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar The Revenge) आता डिजिटल पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर प्रेक्षक आता हा ॲक्शन-थ्रिलर सिनेमा घरी बसून कधी पाहता येईल, याची आतुरतेने वाट पाहत आहेत. रणवीर सिंगच्या या स्पाय-युनिव्हर्स चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
'धुरंधर'चा पहिला भाग 'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित झाला होता, मात्र दुसरा भाग हा 'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित होणार नाही. दिग्दर्शक आदित्य धरनं 'धुरंधर २' चे डिजिटल हक्क (OTT Rights) जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) ला विकल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर नव्हे, तर जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार असल्याची दाट शक्यता आहे.
कधी होणार स्ट्रीम?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'जिओ हॉटस्टार' या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहे. सध्या सुरू असलेल्या IPL 2026 (इंडियन प्रीमियर लीग) मुळे या चित्रपटाचा ओटीटी रिलीज काही काळ लांबणीवर टाकण्यात आला आहे. आयपीएल संपल्यानंतर, म्हणजेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. मात्र, अद्याप निर्मात्यांनी अधिकृत तारखेची घोषणा केलेली नाही.
बॉक्स ऑफिसवरील ऐतिहासिक कामगिरी
१९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांतच कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले.जागतिक कमाई १६६० कोटी रुपये तर भारतीय ग्रॉस कलेक्शन हे १२०० कोटींहून अधिक झालं आहे. सर्वात कमी वेळात १००० कोटींचा आकडा पार करणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.