कास्टिंग रुम ते 'धुरंधर'चा सेट! १,३०० मुलींना पछाडत २० वर्षांच्या साराने केली कमाल; 'अशी' बनली रणवीरची नायिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 14:15 IST2025-11-19T14:08:31+5:302025-11-19T14:15:53+5:30
१,३०० मुलींमधून 'अशी' बनली सारा अर्जुन धुरंधरची हिरोईन! दिग्दर्शकाने सांगितला कास्टिंगचा किस्सा

कास्टिंग रुम ते 'धुरंधर'चा सेट! १,३०० मुलींना पछाडत २० वर्षांच्या साराने केली कमाल; 'अशी' बनली रणवीरची नायिका
Sara Arjun Casting On Durandhar: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा गँगस्टर-ड्रामा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि सारा अर्जुन या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. त्यामुळे सिनेरसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, या सगळ्यात २० वर्षाची अभिनेत्री सारा अर्जुन भाव खाऊन गेली आहे. परंतु, साराला ही भूमिका इतक्या सहज मिळाली नाही, असे सांगण्यात आले, उलट १३०० हून अधिक मुलींनी त्यासाठी ऑडिशन दिलं होतं. दिग्दर्शक आदित्य धर यांनी हा खुलासा केला आहे.
'उरी-द सर्जिकल स्ट्राईक' आणि 'आर्टिकल ३७०' यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन आदित्य धर यांनी केलं आहे. लवकरच ते धुरंधर हा नवा-कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. अशातच नुकत्याच दिलेल्या एका इव्हेंटमध्ये त्यांनी धुरंधर चित्रपटातील सारा अर्जुनच्या कास्टिंगविषयी खुलासा केला आहे.
त्यादरम्यान, आदित्य धर म्हणाले की, त्यांना चित्रपटातील या भूमिकेसाठी एक नवीन चेहरा पाहिजे होता. सारा अर्जुनच्या भूमिकेसाठी कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्या टीमने सुमारे १३०० मुलींचे ऑडिशन घेतले. यानंतर, अखेर सारा अर्जुनला रणवीर सिंगच्या अपोझिट फिमेल लीड म्हणून कास्ट करण्यात आलं. पण, साराने आपल्या कामातून हे दाखवून दिलं की ती या भूमिकेसाठी अगदी योग्य आहे.
कोण आहे सारा अर्जुन?
सारा अर्जुन हा इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. बालकलाकार म्हणून तिने मालिकाविश्वात पदार्पण केलं. तिने आजवर अनेक चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. 'देईवा थिरुमगल' या तमिळ चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली होती. याशिवाय साराने पोन्नियिन सेल्वनमध्ये ऐश्वर्या रायच्या बालपणीची भूमिका साकारली आहे. सारा दाक्षिणात्य अभिनेता राज अर्जुनची मुलगी आहे. "धुरंधर" या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. येत्या ५ डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.