'धुरंधर'ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी! पाच दिवसात कमावले 'इतके' कोटी, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:55 IST2025-12-10T12:52:32+5:302025-12-10T12:55:03+5:30
रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पाच दिवसात छप्परफाड कमाई केली आहे. आकडा वाचून थक्कच व्हाल

'धुरंधर'ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी! पाच दिवसात कमावले 'इतके' कोटी, जाणून घ्या
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला यशस्वी प्रवास सुरू ठेवला आहे. रिलीज झाल्यापासूनच हा अॅक्शन चित्रपट प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. विशेष म्हणजे, वीकेंड संपल्यानंतरही या चित्रपटाच्या कमाईत कोणतीही मोठी घसरण झाली नाही, उलट मंगळवारी कलेक्शनमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत १५० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
'धुरंधर'ने पाचव्या दिवशी, म्हणजेच मंगळवारी, २६.५० कोटी रुपयांची कमाई केली. या कमाईसह, चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता १५२.७९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 'धुरंधर'ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी २८ कोटी रुपयांची कमाई केली होती आणि पहिल्या तीन दिवसांतच १०० कोटींचा आकडा सहज गाठला होता.
दुसरीकडे, धनुष आणि क्रिती सेनन यांचा 'तेरे इश्क में' हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर तग धरून आहे. रणवीरच्या चित्रपटाची मोठी स्पर्धा असूनही, 'तेरे इश्क में' दुसऱ्या आठवड्यातही चांगली कमाई करत आहे.
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १२ दिवस पूर्ण केले आहेत आणि १२ व्या दिवशी, म्हणजेच मंगळवारी २.८५ कोटी रुपये कमावले. यासह 'तेरे इश्क में' या चित्रपटाचे एकूण कलेक्शन १०५.२५ कोटी रुपये झाले आहे. या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर सुरू असलेली ही यशस्वी दौड पाहता, सिनेमागृहांमध्ये सध्या प्रेक्षकांची गर्दी कायम आहे.