"अक्षय खन्ना सेटवरही रहमान डकैतसारखं वागायचे..."; 'धुरंधर' अभिनेत्याचा मोठा खुलासा; रणवीरबद्दल काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 08:47 IST2026-01-06T08:41:14+5:302026-01-06T08:47:25+5:30
अक्षय खन्ना, रणवीर सिंगबद्दल धुरंधरमधील डोंगाने मोठा खुलासा केला आहे. याशिवाय मनातील भावना व्यक्त केल्या आहेत

"अक्षय खन्ना सेटवरही रहमान डकैतसारखं वागायचे..."; 'धुरंधर' अभिनेत्याचा मोठा खुलासा; रणवीरबद्दल काय म्हणाला?
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट प्रदर्शित होऊन महिना उलटला असला, तरी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची बक्कळ कमाई अजूनही सुरुच आहे. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे, मात्र सर्वाधिक चर्चा अक्षय खन्नाने साकारलेल्या 'रहमान डकैत' या पात्राची होताना दिसत आहे. या संदर्भात चित्रपटातील सहकलाकार नवीन कौशिकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे.
अक्षय खन्ना सेटवर अंतर राखून असायचा
सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत नवीन कौशिकने सांगितले की, ''शूटिंगच्या वेळेस अक्षय खन्ना सेटवर इतर लोकांपासून कायम अंतर राखून असायचे. अक्षय खन्ना त्यांच्या भूमिकेत इतके गुंग असायचे की ते सेटवरील गोंधळापासून लांब राहणे पसंत करायचे. रहमान डकैत हे पात्र जसं शांत आहे. पण कधी काय करेल हे सांगता येत नाही. त्यामुळेच अक्षय सर सेटवरही तसंच वागायचे. आम्ही त्यांच्याशी बोलायला गेलो तर ते प्रेमाने बोलायचे, पण बोलणं संपलं की ते पुन्हा आपल्या विश्वात हरवून जायचे."
रणवीर सिंग म्हणजे '१००० व्होल्टचा करंट'
रणवीर सिंगबद्दल बोलताना नवीनने त्याचे भरभरून कौतुक केले. तो म्हणाला, "रणवीर हा ऊर्जेचा एक स्रोत आहे. तो सेटवर आला की जणू १००० व्होल्टची वीज संचारत आहे, असे वाटते. इतका मोठा स्टार असूनही त्याच्यात कोणताही गर्व नाही. तो लहान मुलांसारखा जिज्ञासू आहे आणि सेटवर प्रत्येकाशी मित्रासारखा वागतो."
अक्षय खन्नाच्या अभिनयाचे कौतुक होत असले तरी, नवीन कौशिकच्या मते रणवीर सिंगने साकारलेल्या भूमिकेकडे दुर्लक्ष होणे हे त्याच्यावर अन्याय झाल्यासारखं आहे. नवीन म्हणाला, "अक्षय सरांनी नक्कीच अविस्मरणीय भूमिका साकारली आहे. पण रणवीरने जो अभिनय केला आहे, तो जास्त कठीण आहे. खऱ्या आयुष्यात इतका उत्साही आणि ऊर्जेने भरलेला माणूस असूनही, त्याने चित्रपटातील शांत आणि गंभीर 'हमजा' हे पात्र ज्या बारकाव्यांसह साकारले आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. म्हणूनच मला वाटते की रणवीरला त्याचे योग्य श्रेय मिळायला हवे होते. त्यामुळे रणवीरला हवं तितकं कौतुक न मिळणं हे त्याच्यावर अन्याय झाल्यासारखं आहे."
एकूणच बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांसारख्या तगड्या कलाकारांच्या अभिनयामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे. नवीन कौशिकच्या या विधानानंतर आता सोशल मीडियावर रणवीर आणि अक्षयच्या चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. नवीन कौशिकने सिनेमात 'डोंगा' हे पात्र साकारलं आहे.