'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीने पाहिला 'धुरंधर २', म्हणाली "प्रत्येक फ्रेम जबरदस्त..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:28 IST2026-02-12T15:28:01+5:302026-02-12T17:28:19+5:30
'धुरंधर २'चा पहिला Review आला समोर, रुपाली गांगुली सिनेमा पाहून म्हणाली...

'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीने पाहिला 'धुरंधर २', म्हणाली "प्रत्येक फ्रेम जबरदस्त..."
रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता प्रेक्षकांचे लक्ष त्याच्या सिक्वेलकडे लागले आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) हा चित्रपट मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून 'टॉक्सिक'सोबत त्याची थेट टक्कर होणार आहे. प्रेक्षकांनी फक्त टीझर पाहिला असला, तरी छोट्या पडद्यावरील 'अनुपमा' म्हणजेच अभिनेत्री रुपाली गांगुलीने या चित्रपटाचे काही महत्त्वाचे भाग पाहिले असून तिने दिलेला रिव्ह्यू सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
रुपाली गांगुलीचा भाऊ विजय गांगुली हा 'धुरंधर'च्या पहिल्या भागात कोरिओग्राफर होता आणि दुसऱ्या भागातही तो महत्त्वपूर्ण काम करत आहे. रुपालीने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, " 'धुरंधर'चा पहिला भाग दोनदा थिएटरमध्ये पाहिला असून सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. मी कालच 'धुरंधर २' चे काही शॉट्स पाहिले. माझा भाऊ विजय गांगुली एडिटिंग करत असताना आम्ही व्हिडीओ कॉलवर होतो. त्याने मला काही दृश्ये दाखवली. ते इतके अप्रतिम होते की मी त्याला ते रिवाइंड करून पुन्हा दाखवायला लावले. प्रत्येक फ्रेम एखाद्या मास्टरपीससारखी आहे".
काय असेल 'धुरंधर २'?
पहिल्या भागात कराचीच्या 'ल्यारी' भागातील गँगस्टर नेटवर्क दाखवण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या भागात हे संपूर्ण मिशन नेमकं काय होतं, याचा सविस्तर उलगडा होणार आहे. या भागात रणवीर सिंगसोबत आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि संजय दत्त यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच, पहिल्या भागात मृत दाखवलेला 'रहमान डकैत' (अक्षय खन्ना) फ्लॅशबॅक दृश्यांमध्ये पुन्हा दिसण्याची शक्यता आहे.
बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर
'धुरंधर २' हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी सिनेमागृहात धडकणार आहे. विशेष म्हणजे, याच काळात साऊथ सुपरस्टार यश याचा 'टॉक्सिक' हा चित्रपटही प्रदर्शित होत असल्याने बॉक्स ऑफिसवर दोन मोठ्या चित्रपटांची जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे.