Dhurandhar 2 Box Office: 'धुरंधर २'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा! पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 10:10 IST2026-03-19T10:08:57+5:302026-03-19T10:10:48+5:30
रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांची मनेच जिंकली नाहीत, तर कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत

Dhurandhar 2 Box Office: 'धुरंधर २'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा! पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी
रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर २' (Dhurandhar 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांची मनेच जिंकली नाहीत, तर कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, 'धुरंधर २'ने पहिल्या दिवशी ५० कोटी रुपयांहून अधिक कमाई करून भारतीय सिनेसृष्टीत नवा इतिहास रचला आहे.
मोठ्या चित्रपटांचे विक्रम मोडीत
'धुरंधर २' ने आपल्या पहिल्या दिवसाच्या कमाईसह पवन कल्याणचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'OG' आणि श्रद्धा कपूरचा ब्लॉकबस्टर 'स्त्री २' (Stree 2) यांचे ओपनिंग डे रेकॉर्ड्स मागे टाकले आहेत. एकाच दिवशी ५० कोटींचा आकडा पार करणे ही रणवीर सिंगच्या करिअरमधील आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग ठरली आहे. या कामगिरीमुळे रणवीर सिंग आता बॉक्स ऑफिसचा नवा 'धुरंधर' म्हणून समोर आला आहे.
प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून, सकाळच्या शोपासूनच 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड झळकत आहेत. विशेषतः मुंबईसारख्या शहरांमध्ये आणि दक्षिण भारतात चित्रपटाची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. सेन्सॉर बोर्डाचे कट्स आणि तांत्रिक कारणांमुळे काही प्रिव्ह्यू शोज रद्द होऊनही, मुख्य प्रदर्शनाच्या दिवशी चित्रपटाने केलेली ही कमाई थक्क करणारी आहे.
आदित्य धरचे दिग्दर्शन, रणवीर सिंगचा जबरदस्त परफॉर्मन्स आणि चित्रपटाचा हाय-ऑक्टेन ॲक्शन ड्रामा यामुळे प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहाकडे वळत आहेत. तसेच, चित्रपटाच्या प्रमोशनमुळे निर्माण झालेली उत्सुकता आणि प्रदर्शनापूर्वी झालेले १०० कोटींचे ॲडव्हान्स बुकिंग याचाही मोठा फायदा चित्रपटाला मिळाला आहे.
हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात २०० ते २५० कोटींचा आकडा सहज पार करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. सोशल मीडियावरही चित्रपटाचे सकारात्मक रिव्ह्यू व्हायरल होत असल्याने आगामी दिवसांत 'धुरंधर २' अनेक बॉक्स ऑफिस कमाईचे नवे रेकॉर्ड प्रस्थापित करण्याची शक्यता आहे. रणवीर सिंगसाठी हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरेल, अशी शक्यता आहे