"धर्मेंद्र अंकलने ICUमधून माझ्या आईला केला होता फोन आणि म्हणालेले...", अभिनेत्याने सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:44 IST2025-11-26T12:43:38+5:302025-11-26T12:44:56+5:30
Dharmendra : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी जगाचा निरोप घेतला. पण दिवंगत अभिनेत्याच्या आठवणी जवळपास प्रत्येक चित्रपट कलाकाराजवळ आहेत. अभिनेता निकितिन धीरने धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहताना एक किस्सा सांगितला, जेव्हा धर्मेंद्र यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर थेट हॉस्पिटलच्या ICU मधून फोन केला होता.

"धर्मेंद्र अंकलने ICUमधून माझ्या आईला केला होता फोन आणि म्हणालेले...", अभिनेत्याने सांगितला किस्सा
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे या जगातून निघून जाणे, प्रत्येकाच्या आठवणीत एक अशी पोकळी निर्माण करून गेले आहे, जी कधीही भरली जाऊ शकत नाही. अभिनेता निकितिन धीरने त्यांना आठवत असताना, धर्मेंद्र यांच्या शेवटच्या दिवसांत हॉस्पिटलमधून आलेल्या एका भावनिक फोन कॉलची आठवण सांगितली आहे. अभिनेत्याने सांगितले की, धर्मेंद्र यांनी फोनवर लवकरच हॉस्पिटलमधून घरी परतण्याची ग्वाही दिली होती.
धर्मेंद्र यांच्या निधनामुळे सध्या चित्रपटसृष्टीत सर्वत्र शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर, जिथे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या घरी चित्रपट कलाकारांची सतत ये-जा सुरू आहे, तिथे अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरही काही आठवणी सांगितल्या आहेत. निकितिनने सांगितले की, त्याच्या वडिलांच्या निधनानंतर जेव्हा धर्मेंद्र हॉस्पिटलमध्ये दाखल होते, तेव्हा त्यांनी निकितिन यांच्या आई अनीता धीर यांच्याशी संवाद साधला होता.
"धरम अंकल यांनी ICU मधून माझ्या आईला केलेला फोन"
निकितिनने लिहिले, "जेव्हा माझ्या वडिलांचे (पंकज धीर) निधन झाले, तेव्हा धरम अंकल यांनी ICU मधून माझ्या आईला फोन केला आणि आपले प्रेम व सहानुभूती व्यक्त केली. त्यांनी आईला सांगितले होते की ते लवकरच घरी परत येतील, काळजी करू नका." हॉस्पिटलमधून केलेला तो फोन त्यांच्या सुंदर मनाचे प्रतीक असल्याचे निकितिन मानतो.
"इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी हिरो कोण आहे?"
निकितिनने पुढे सांगितले की, धर्मेंद्र यांच्यासोबत त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे अनेक दशकांचे जुने नाते होते. त्याने आठवण करून दिली की, ते आणि त्यांचे दिवंगत वडील भारतीय सिनेमातील महान अभिनेत्याबद्दल अनेकदा चर्चा करत असत आणि त्यावर पंकज धीर यांचे उत्तर नेहमी एकच असायचे की, धर्मेंद्र. निकितिनने त्याचे दिवंगत वडील पंकज धीर यांच्यासोबतचे धर्मेंद्र यांचे जुने फोटो शेअर केले आणि लिहिले, "माझे वडील आणि मी नेहमी चर्चा करायचो की, आमच्या इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी हिरो कोण आहे. बाबा डोळ्यांची पापणी न लवता म्हणायचे - धर्म अंकल! आणि ते नेहमी सांगायचे की सर्वात मर्दानी, सर्वात देखणा, सर्वात विनम्र आणि सोन्यासारख्या हृदयाचा माणूस... अगदी ओरिजनल... धर्म अंकल..."
"आम्ही त्यांच्या मांडीवर वाढलो"
निकितिन म्हणाला की, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या बहिणीसाठी धर्मेंद्र एका महान अभिनेत्यापेक्षाही जास्च होते. ते कुटुंब होते. तो म्हणाला, "आम्ही त्यांच्या मांडीवर वाढलो, त्यांच्याकडून फक्त प्रेम आणि आशीर्वाद मिळाला. त्यांना नेहमी हसताना पाहिले, ज्या हास्याने संपूर्ण खोली उजळून निघायची." त्याने म्हटले, "आमच्या बालपणात आनंद भरल्याबद्दल धन्यवाद. माणूस काय असू शकतो आणि कसा असायला हवा, हे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही निर्माण केलेली पोकळी कोणीही भरू शकत नाही. धर्मेंद्र यांच्यासारखे दुसरे कोणीही कधीच होणार नाही."
दीर्घ आजारानंतर धर्मेंद्र यांचे निधन
धर्मेंद्र यांच्यावर नोव्हेंबर महिन्यात मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. दीर्घ आजारानंतर २४ नोव्हेंबर रोजी अभिनेत्याचे निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार पवन हंस स्मशानभूमीत झाले, जिथे अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.