Dharmendra Death: धर्मेंद्र यांचं निधन, मागे सोडली इतक्या कोटींची संपत्ती; फार्महाऊसमध्ये पहिल्या पत्नीसोबत राहत होते 'ही-मॅन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 14:38 IST2025-11-24T14:37:33+5:302025-11-24T14:38:17+5:30
Dharmendra passes away : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं नुकतंच निधन झालं आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.

Dharmendra Death: धर्मेंद्र यांचं निधन, मागे सोडली इतक्या कोटींची संपत्ती; फार्महाऊसमध्ये पहिल्या पत्नीसोबत राहत होते 'ही-मॅन'
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. ८९ वर्षांचे धर्मेंद्र अजूनही अभिनयाच्या जगतात सक्रिय होते. त्यांचा शेवटचा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. धर्मेंद्र यांनी अनेक दशकांपासून इंडस्ट्रीवर राज्य केले आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे.
धर्मेंद्र यांनी दोन लग्न केले होते. त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्यापासून त्यांना दोन मुली, विजेता आणि अजिता देओल, तसेच दोन मुलगे, सनी देओल आणि बॉबी देओल आहेत. त्यांनी दुसरी पत्नी म्हणून हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले होते, ज्यांच्यापासून त्यांना ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत. जेव्हा धर्मेन्द्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले, तेव्हा त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर जिवंत होत्या आणि त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही.
धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती
धर्मेंद्र यांनी सिनेइंडस्ट्रीत आपल्या कठोर परिश्रमातून आणि प्रतिभेच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे चित्रपट खूप गाजले. रिपोर्ट्सनुसार, धर्मेंद्र ४५० कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक होते. ते त्यांच्या फार्महाऊसमध्ये राहात होते, जिथले ते फोटो आणि व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असत.
असा होता फार्महाऊस
धर्मेंद्र यांचा फार्महाऊस खूप आलिशान आहे. खंडाळ्यात १०० एकरमध्ये त्यांचे आलिशान फार्महाऊस बांधलेले आहे. या फार्महाऊसमध्ये सर्व सोयी-सुविधा आहेत. तिथे ते शेती देखील करत होते, ज्याची झलक ते चाहत्यांना दाखवत असत. रिपोर्ट्सनुसार, धर्मेंद्र यांच्या या आलिशान फार्महाऊसची किंमत सुमारे १२० कोटी रुपये सांगितली जाते. धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओलने एकदा सांगितले होते की, धर्मेंद्र फार्महाऊसवर त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबत राहत होते. बॉबी म्हणाला होता की, ''लोकांना वाटते की माझे वडील फार्महाऊसवर एकटे राहतात. पण तसे नाहीये. माझी आईसुद्धा त्यांच्यासोबत असते. ते दोघे खंडाळ्यात राहतात. आई आणि वडील सोबत आहेत. माझ्या आई-वडिलांना फार्महाऊसवर राहायला आवडते. आता ते वृद्ध झाले आहेत. फार्महाऊसवर त्यांना आरामदायी वाटते. तिथे हवामान आणि जेवण चांगले असते.''
महागड्या गाड्यांची होती आवड
धर्मेंद्र यांच्याकडे अनेक आलिशान गाड्या होत्या. त्यांच्या कलेक्शनमध्ये मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, मर्सिडीज बेंझ एसएल ५०० आणि लँड रोव्हर रेंज रोव्हर यांसारख्या महागड्या कार्सचा समावेश आहे. पण त्यांची सर्वात आवडती कार ६५ वर्ष जुनी 'फिएट' होती.