"तेव्हा धर्मेंद्रजींची अवस्था खूपच नाजूक होती, मी सनी देओलला...", अमीषा पटेलने सांगितलं हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 13:48 IST2025-11-25T13:47:25+5:302025-11-25T13:48:00+5:30
अमीषा पटेलही धर्मेंद्र यांची भेट घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना अमीषाचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता अमीषाने धर्मेंद्र यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

"तेव्हा धर्मेंद्रजींची अवस्था खूपच नाजूक होती, मी सनी देओलला...", अमीषा पटेलने सांगितलं हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं?
Dharmendra Passed Away: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं सोमवारी(२४ नोव्हेंबर) निधन झालं. मुंबईतील जुहू येथील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ८९व्या वर्षी धर्मेंद्र यांनी या जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत बिघाड होत असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र नंतर त्यांची प्रकृती सुधारल्याने धर्मेंद्र यांना घरी सोडण्यात आलं होतं. त्यानंतर धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने चाहते आणि सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे.
धर्मेंद्र हॉस्पिटलमध्ये असताना अनेक सेलिब्रिटींनी त्यांची भेट घेतली होती. अमीषा पटेलही धर्मेंद्र यांची भेट घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना अमीषाचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता अमीषाने धर्मेंद्र यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. न्यूज १८ शी बोलताना अमीषा म्हणाली, "मी अजूनही त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क केलेला नाही. कारण सध्या ते भावनिक तणावात असतील. मी त्यांना त्रास देऊ इच्छित नाही. कारण त्यांच्याकडे अनेक लोक येत असतात त्यामुळे हे योग्य होणार नाही. त्यांना सध्या प्रायव्हसी देणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी हा कठीण काळ आहे. त्यांना आपण वेळ देणं गरजेचं आहे. मी मुंबईत आल्यावर सगळ्यात आधी त्यांना जाऊन भेटेन".
"मी, सलमान, शाहरुख धर्मेंद्र यांना बघण्यासाठी हॉस्पिटलला गेलो होतो. तेव्हाची परिस्थिती फारच नाजूक होती. त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना एकटं सोडणं गरजेचं होतं. धर्मेंद्रजी तेव्हा खूपच नाजूक अवस्थेत होते. मी, शाहरुख आणि सलमानने सनी देओलला भेटून त्याला मिठी मारून आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काय करायचं हे त्याला सुचत नव्हतं. कारण, हे त्या व्यक्तीबाबत होतं ज्यावर सनी पाजी सगळ्यात जास्त प्रेम करतात", असं अमीषा म्हणाली.