Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 18:27 IST2025-11-24T18:26:48+5:302025-11-24T18:27:47+5:30
धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा सनी देओलने त्यांना मुखाग्नी दिला.

Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
Dharmendra Passed Away:ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरी ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं. पण प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. नंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. पण अखेर आज(२४ नोव्हेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कलाविश्वात कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. तर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा सनी देओलने त्यांना मुखाग्नी दिला. देओल कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला निरोप दिला. सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी त्यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सलीम खान, संजय दत्त, आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार हे कलाकार धर्मेंद्र यांच्या अंत्यविधीला उपस्थित होते.
धर्मेंद्र यांनी जवळपास ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं होतं. वयाची नव्वदी गाठली तरी ते बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. १९६० साली अभिनयात पदार्पण केलेल्या धर्मेंद्र यांनी ६ दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. धर्मेंद्र हे 'इक्कीस' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते. हाच त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. धर्मेद्र यांनी गेली अनेक वर्ष त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडवर राज्य केलं. बॉलिवूडचे ही मॅन म्हणून धर्मेंद्र यांची ओळख होती. शोले, बंदिनी, हकीकत, मेरा कसूर क्या है, काजल, आकाशदीप, देवर अशा विविध सिनेमांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. धर्मेंद्र यांचे अलीकडेच रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि तेरी बातों में ऐसा उलझा जिया हे दोन सिनेमे रिलीज झाले होते. दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर सुपरहिट यश मिळालं.