"माझे प्रिय पापा..." धर्मेंद्र यांच्या वाढदिवशी लेक ईशाची पोस्ट, वाचून तुमचेही डोळे पाणावतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 10:49 IST2025-12-08T10:48:47+5:302025-12-08T10:49:10+5:30
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवशी लाडक्या लेकीची भावनिक पोस्ट

"माझे प्रिय पापा..." धर्मेंद्र यांच्या वाढदिवशी लेक ईशाची पोस्ट, वाचून तुमचेही डोळे पाणावतील
बॉलिवूडचे "ही-मॅन" आणि लाखो चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. धर्मेंद्र यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जर ते जीवंत असते तर आज ८ डिसेंबर रोजी त्यांचा ९० वा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला असता. आज त्यांच्या वाढदिवशी मुलगी अभिनेत्री ईशा देओल हिने एक अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.
वडिलांच्या निधनानंतर ईशा देओलने केलेली ही पहिलीच पोस्ट आहे. या भावनिक पोस्टमध्ये तिने वडिलांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये ईशाने आपल्या वडिलांना उद्देशून लिहलं, "माझे प्रिय पापा... आपल्यातील नातं इतकं अतूट आहे. आपल्याला कुणीच वेगळं करू शकत नाही. आपण आयुष्य, संपूर्ण जग आणि त्याही पलीकडे आहोत. स्वर्ग असो वा पृथ्वी, आपण एक आहोत. सध्या मी तुम्हाला अतिशय प्रेमाने, काळजीने माझ्या हृदयात लपवलं आहे. जेणेकरून उर्वरित आयुष्यभर तुम्ही माझ्यासोबत राहाल", असे ईशाने म्हटले.
ईशा देओलने आपल्या पोस्टमध्ये धर्मेंद्र आठवणींमुळे होणाऱ्या वेदना व्यक्त केल्या. तिनं लिहलं, "त्या जादुई, अनमोल आठवणी… तुम्ही दिलेले आयुष्याचे धडे, शिकवण, मार्गदर्शन, माया, प्रेम, सन्मान आणि सामर्थ्य. मुलगी म्हणून तुम्ही मला दिलेलं हे सगळं कुणीही कधीच भरून काढू शकत नाही. त्यांची तुलना केली जाऊ शकत नाही. मला तुमची खूप आठवण येते पापा... तुमची मिठी, जी सर्वांत सुरक्षित वाटायची. तुमचे नरम पण मजबूत हात... ज्यात प्रेम दडलं होतं. माझं नाव घेऊन मला हाक मारणारा तुमचा आवाज... आपल्यातल्या त्या गप्पा, हसणं आणि शायरी".
ईशाने धर्मेंद्र यांना वचन देत लिहलं, "'नेहमी नम्र, आनंदी, निरोगी आणि मजबूत राहा' हे तुमचं ब्रीदवाक्य. मी वचन देते, पप्पा... तुमची परंपरा, तुमची शिकवण अभिमानाने आणि सन्मानाने पुढे नेईन. मी माझ्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करेन की, ज्या लाखो लोकांनी तुम्हाला प्रेम दिलं, त्यांच्यापर्यंत तुमचं प्रेम तसंच पोहोचवत राहीन. आय लव्ह यू पप्पा. तुमची लाडकी लेक, तुमची ईशा, तुमची बिट्टू", या शब्दात ईशानं धर्मेंद्र यांच्यावरील प्रेम व्यक्त केलं.
देओल कुटुंब धर्मेंद्र यांचा ९० वा वाढदिवस साजरा करणार
धर्मेंद्र यांच्या असंख्य चाहत्यांना अभिनेत्याचं अंतिम दर्शन घेता आलं नाही. म्हणूनच धर्मेंद्र यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच आज ८ डिसेंबर रोजी खंडाळा येथील फार्महाऊस चाहत्यांसाठी खुलं करण्यात येणार आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना अभिनेत्याला श्रद्धांजली देता येईल. 'हा कोणताही विशेष फॅन इव्हेंट नसेल. धर्मेंद्र यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी चाहत्यांना फार्म हाऊसमध्ये येता येईल. खंडाळा येथील फार्महाऊस धर्मेंद्र यांचं आवडतं ठिकाण होतं. ते अनेकदा तिथे कुटुंबासोबत वेळ घालवायते. फार्महाऊसवर धर्मेंद्र शेती करायचे आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचे. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या आवडत्या ठिकाणी त्यांची पहिली जयंती करण्याचा निर्णय देओल कुटुंबाने घेतला