धनुष खरंच धुळ्याचा जावई होणार? मृणाल ठाकूरच्या 'त्या' कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 14:05 IST2025-08-09T14:03:18+5:302025-08-09T14:05:26+5:30
मृणाल ठाकूरने एक छोटीशी कृती केल्याने धनुष आणि तिच्या नात्यावर सर्वांनी शिक्कामोर्तब केलंय. काय घडलंय नेमकं?

धनुष खरंच धुळ्याचा जावई होणार? मृणाल ठाकूरच्या 'त्या' कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष
दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता धनुष आणि बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या रिलेशनशीपच्या चर्चांना सध्या चांगलाच जोर आला आहे. अलीकडे ‘सन ऑफ सरदार २’च्या प्रीमिअरदरम्यान दोघे एकत्र दिसले आणि हातात हात घालून गप्पा मारतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओनंतर चाहत्यांमध्ये त्यांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा सुरू झाली. अशातच मृणालने केलेल्या एका कृतीने धनुष आणि मृणाल एकमेकांना खरंच डेट करत आहेत का, असा प्रश्न पुन्हा निर्माण झालाय.
मृणालची ती कृती अन्...
मृणाल - धनुषच्या रिलेशनशीपच्या चर्चांना खतपाणी घालणारी एक गोष्ट घडलीये. ती म्हणजे मृणाल ठाकूरने अलीकडेच धनुषच्या बहिणी कार्थिका आणि विमलाला इन्स्टाग्रामवर फॉलो केले आहे. इतकंच नव्हे धनुषच्या बहिणींनीही मृणालला फॉलो बॅक केलं आहे. मृणालची धनुषच्या कुटुंबाशी जवळीक झाल्याने चाहत्यांनी या दोघांच्या नात्याला आणखी पुष्टी दिली आहे.
याचदरम्यान, मृणालचा एक जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे, ज्यात ती धनुषच्या लोकप्रिय ‘इडली कडई’ या गाण्यावर कारमध्ये बसून आनंदाने गाताना दिसते. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी धनुष खरंच धुळ्याचा जावई होणार का? अशी अटकळ बांधायला सुरुवात केलीय.
मीडिया रिपोर्टनुसार, धनुष आणि मृणाल यांची ओळख काही महिन्यांपूर्वी एका चित्रपटाच्या कार्यक्रमादरम्यान झाली. दोघांचे स्वभाव आणि विचार जुळल्याने त्यांच्यात मैत्री लवकरच घट्ट झाली. मात्र, सध्या तरी दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल गुप्तता पाळणंच पसंत केलंय. दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर मृणाल नुकतीच 'सन ऑफ सरदार २' सिनेमात झळकली. तर धनुष 'कुबेरा' सिनेमात झळकला असून तो लवकरच अब्दुल कलाम यांच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे.