अधुरी एक कहाणी..! 'ही' अभिनेत्री आयुष्यभर देव आनंद यांच्यासाठी 'अविवाहित' राहिली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 16:16 IST2025-09-26T16:10:49+5:302025-09-26T16:16:26+5:30
धर्माची भिंत आडवी आली आणि दोघांचं प्रेम यशस्वी होऊ शकलं नाही.

अधुरी एक कहाणी..! 'ही' अभिनेत्री आयुष्यभर देव आनंद यांच्यासाठी 'अविवाहित' राहिली!
बॉलिवूडचे एव्हरग्रीन सुपरस्टार देव आनंद यांचा आज जन्मदिवस. देव आनंद हे त्यावेळी खूप यशस्वी अभिनेते होते. देखणा बॉलिवूड अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यासाठी अनेक तरुणी जीव ओवाळून टाकण्यासाठी तयार असायच्या. त्याकाळात सोशल मीडिया नव्हतं, अशाही परिस्थितीत देव आनंद यांचे तरुणींमध्ये वेड होते. महाविद्यालयीन तरुणांमध्ये त्यांची स्टाइल कॉपी करण्याचे प्रमाण अधिक होते. पडद्यावर देव आनंद यांचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले, पण त्यांच्या आयुष्यात अशी एक अभिनेत्री होती, जिच्या प्रेमात ते स्वतः पडले होते. मात्र त्यांचे प्रेम अपुरे राहिले आणि ती अभिनेत्री आयुष्यभर अविवाहित राहिली.
देव आनंद यांनी अभिनेत्री कल्पना कार्तिक यांच्याशी लग्न केले असले तरी, त्यांची पहिली आणि अपूर्ण प्रेमकहाणी अभिनेत्री सुरैयासोबतची होती. ई-टाईम्सच्या वृत्तानुसार, देव आनंद आणि सुरैया यांची प्रेमकहाणी १९४८ मध्ये 'विद्या' चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली. 'किनारे किनारे चले जायेंगे' या गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्यांची बोट अचानक उलटली. तेव्हा देव आनंद यांनी खऱ्या नायकाप्रमाणे सुरैयाला वाचवले. या घटनेनंतर सुरैया देव आनंदच्या प्रेमात पडली. देव आनंद यांनी सुरैयाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
१९५० च्या दशकात 'जीत' चित्रपटाच्या सेटवर त्यांनी सुरैयाला एक खास भेट दिली. त्यांनी ३,००० रुपयांची हिऱ्याची अंगठी देऊन तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. देव आनंद आणि सुरैया यांचे प्रेम फुलू शकले नाही, कारण सुरैयाच्या कुटुंबियांचा या नात्याला विरोध होता. देव आनंद एका पंजाबी कुटुंबातून आले होते, तर सुरैया मुस्लिम होत्या. सुरैयाच्या आजीचा तिच्या दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्नाला पूर्णपणे विरोध होता. या विरोधामुळे त्यांचे प्रेम लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही आणि दोघांचे मार्ग वेगळे झाले. देव आनंद यांनी पुढे कल्पना कार्तिकशी लग्न केले, पण सुरैयाने मात्र आयुष्यभर लग्न केले नाही. सुरैया आयुष्यभर देव आनंद यांच्या आठवणीत अविवाहित राहिल्या.