'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 16:40 IST2025-08-10T16:39:08+5:302025-08-10T16:40:16+5:30
अमिताभ बच्चन यांचीही आहे मुख्य भूमिका, 'द इंटर्न' या सुपरहिट हॉलिवूड सिनेमाचा हिंदी रिमेक

'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
'द इंटर्न' (The Intern) हा २०१५ साली आलेला हॉलिवूडचा सुपरहिट सिनेमा. या सिनेमात रॉबर्ट डि नीरो आणि अॅनी हॅथवेने मुख्य भूमिका साकारली होती. निवृत्त झाल्यानंतर काहीतरी काम हवं म्हणून रॉबर्ट डी नीरो एका कंपनीत इंटर्न म्हणून रुजू होतात. अॅनी हॅथवे तिथे बॉस असते. नवीन पिढीच्या अनेक नव्या गोष्टी ते कशा समजून घेतात आणि नव्या पिढीची अॅनी त्यांच्याकडून नकळत काय काय शिकते याचं उत्तम सादरीकरण या सिनेमात आहे. याच सुंदर सिनेमाचा हिंदीतही रिमेक येणार आहे अशी अनेक वर्षांपासून चर्चा होती. अमिताभ बच्चन आणि (Amitabh Bachchan) दीपिका पादुकोण (Deepika Padukone) या सिनेमात भूमिका साकारणार होते. मात्र आता नवीन अपडेटनुसार, दीपिका पादुकोणने अभिनेत्री म्हणून या सिनेमातून माघार घेतली आहे. ती केवळ हा सिनेमाची निर्मिती करणार आहे.
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकची चर्चा २०२० पासूनच होती. दीपिकाने या हॉलिवूड सिनेमाचे हक्क विकत घेतल्याची घोषणा केली होती. तसंच हिंदी सिनेमात ती स्वत: भूमिका साकारणार होती. तर तिच्यासोबत ऋषी कपूर यांना घ्यायचं असा आधी विचार सुरु होता. मात्र ऋषी कपूर यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांचं नाव फायनल झालं. नंतर कोरोनामुळे हा प्रोजेक्टच लांबणीवर पडला. मिड डे रिपोर्टनुसार, दीपिकाने अभिनेत्री म्हणून आता द इंटर्न च्या हिंदी रिमेकमधून माघार घेतली आहे. आता ती केवळ सिनेमाच्या निर्मिती आणि लॉजिस्टिक गोष्टींवर लक्ष देणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या अपोझिट नवीन अभिनेत्रीची निवड केली जाणार आहे. तसंच इतक्या वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर सिनेमाची तयारी सुरु होणार आहे.
दीपिका पादुकोण तिच्या KA productions अंतर्गत या सिनेमाची निर्मिती करणार आहे. मात्र ती सिनेमात काम करणार नसल्याने अनेक चाहत्यांची निराशा होण्याची शक्यता आहे. दीपिका आणि अमिताभ बच्चन यांच्यातील बॉन्ड सर्वांनी 'पिकू' सिनेमात पाहिलाच होता. त्यामध्ये त्यांची बापलेकीची केमिस्ट्री हिट झाली होती. सिनेमाची पटकथा, कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट होता. आता 'द इंटर्न' मध्ये कोणती नवी अभिनेत्री दिसणार याची सर्वांना उत्सुकता आहे.