लेडी सिंघम! रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकाची एन्ट्री, दमदार लूकची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 14:37 IST2023-10-15T14:37:07+5:302023-10-15T14:37:31+5:30

रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पदुकोणची वर्णी, पहिला लूक समोर

deepika padukone to play lady police officer in rohit shetty singham again movie | लेडी सिंघम! रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकाची एन्ट्री, दमदार लूकची होतेय चर्चा

लेडी सिंघम! रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकाची एन्ट्री, दमदार लूकची होतेय चर्चा

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी अक्शन फिल्मसाठी ओळखला जातो. त्याच्या अनेक सुपरहिट चित्रपटांपैकी एक म्हणजे 'सिंघम'. २०११ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचा सीक्वल 'सिंघम रिटर्न' २०१४ला प्रदर्शित झाला होता. आता 'सिंघम अगेन'साठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटात आता बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. 

रोहित शेट्टीच्या बहुचर्चित 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पदुकोणची वर्णी लागली आहे. या चित्रपटातील दीपिकाचा पहिला लूक समोर आला आहे. 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात ती शक्ती शेट्टी ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. दीपिकाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन 'सिंघम अगेन'मधील पहिल्या लूकचं पोस्टर शेअर केलं आहे. 

या पोस्टरमध्ये दीपिका पोलिसांच्या वर्दीत दिसत आहे. तिच्या हातात बंदूक असून आजूबाजूचा गुन्हेगार पडल्याचं दिसत आहे. दीपिकाच्या मागे पोलिसांची गाडीही उभी असल्याचं पोस्टरमध्ये दिसत आहे. 'सिंघम अगेन'मधील दीपिकाचा हा दमदार लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. या पोस्टवर कमेंट करत चाहते दीपिकाच्या या लूकचं कौतुक करत आहेत. 

दरम्यान, 'सिंघम' हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. आता 'सिंघम अगेन'साठी प्रेक्षक आतुर आहेत. या चित्रपटात दीपिकाची एन्ट्री झाल्यामुळे 'सिंघम अगेन'बाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २०२४मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: deepika padukone to play lady police officer in rohit shetty singham again movie