'आठ तासांची शिफ्ट' अटीमुळे दीपिकाच्या हातून सिनेमे गेले; आता अभिनेत्री म्हणते- "तीच मोठी चूक..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 16:32 IST2025-11-15T16:31:47+5:302025-11-15T16:32:51+5:30
दीपिका पादुकोणने आठ तासांची शिफ्ट करणार ही मागणी केली होती. आता प्रथमच पुन्हा एकदा दीपिकाने याविषयी स्पष्ट खुलासा केलाय

'आठ तासांची शिफ्ट' अटीमुळे दीपिकाच्या हातून सिनेमे गेले; आता अभिनेत्री म्हणते- "तीच मोठी चूक..."
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने पुन्हा एकदा कामाच्या 'आठ तासांच्या शिफ्ट' मागणीला आपले समर्थन दिलं आहे. आई झाल्यानंतर जीवनातील गोष्टी कशा बदलल्या आहेत, याबद्दल तिने पुन्हा एकदा तिचं स्पष्ट मत मांडलं आहे. दीपिका आणि रणवीर सिंग यांना मुलगी झाली त्यांनी तिचं नाव ठेवलं दुआ. मुलीच्या जन्मानंतर दीपिकाने आपल्या कामाच्या वेळापत्रकात मोठे बदल केले आहेत.
याशिवाय दीपिकाने आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम करण्याची मागणी केल्यानंतर इंडस्ट्रीत तिच्या निर्णयाची मोठी चर्चा सुरू झाली होती. या निर्णयामुळे तिच्या हातून 'स्पिरिट' आणि 'कल्की २८९८ एडी'च्या सीक्वलसारखे मोठे चित्रपट गेले. पण तरीही ती आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
'हार्पर बाजार इंडिया'सोबत बोलताना दीपिकाने याविषयीचा दृष्टिकोन स्पष्ट केला. ती म्हणाली,"आपण गरजेपेक्षा जास्त काम करण्याची सवय लावून घेतली आहे. काम केल्यानंतर येणारा थकवा किती चांगला आहे, हे आपण मानतो. तीच आपली मोठी चूक असते. पण, माणसाचे शरीर आणि मन या दोघांसाठीही दिवसातून आठ तास काम करणे पुरेसे आहे. शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या निरोगी असलो तरच आपण आपल्या कामात सर्वोत्तम योगदान देऊ शकतो. थकलेल्या व्यक्तीला कामावर आणल्याने कोणालाही फायदा होत नाही.''
मातृत्वानंतर दीपिकाचं आयुष्य बदललं
आई झाल्यानंतर आपल्या आयुष्यात कसा बदल झाला, याबद्दल बोलताना दीपिका म्हणाली, "आज माझ्यासाठी यश म्हणजे शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणं आहे. 'वेळ' ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. हा वेळ मी कसा खर्च करते, कोणासोबत खर्च करते, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य असणे, हेच माझ्यासाठी सर्वात मोठे यश आहे."
दीपिकाच्या स्वतःच्या ऑफिसमध्येही सोमवार ते शुक्रवार आठ तासांची शिफ्ट असते आणि एखादी स्त्री आई होणार असेल तर तिच्यासाठी वेगळी पॉलिसी आहे. "बाळांना कामाच्या ठिकाणी नेण्याची गोष्ट प्रत्येक ठिकाणी सामान्य असावी", असंही असं मत तिने व्यक्त केले.
दीपिकाचे आगामी चित्रपट
कामाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, दीपिका सध्या शाहरुख खानसोबत 'किंग' या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. याव्यतिरिक्त, अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक एटली यांच्या मोठ्या बजेटच्या 'AA22xA6' या चित्रपटातही त्या दिसणार आहेत.