मनोज वाजपेयींसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? चिन्मय मांडलेकर म्हणाला-"त्या माणसाइतका..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 19:28 IST2026-01-16T19:18:30+5:302026-01-16T19:28:40+5:30
"त्या माणसाइतका...", चिन्मय मांडलेकरने सांगितला वाजपेयींसह काम करण्याचा अनुभव, म्हणाला-"त्यांना गोष्ट ऐकवण्यासाठी गेलो अन्..."

मनोज वाजपेयींसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? चिन्मय मांडलेकर म्हणाला-"त्या माणसाइतका..."
Chinmay Mandlekar: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, लेखक, निर्माता अशी बहुगुणी ओळख असलेलं नाव म्हणजे चिन्मय मांडलेकर. अनेक मालिकांसह कच्चा लिंबू, हिरकणी, दुनियादारी यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचं त्याने लेखन केलं आहे. आपल्या दमदार अभिनयाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही स्वत: ची एक वेगळी छाप उमटवली आहे. अभिनयानंतर चिन्मय मांडलेकर दिग्दर्शन क्षेत्रात उतरला आहे. अलिकडेच आलेल्या 'इन्स्पेक्टर झेंडे' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने या चित्रपटाच्या संपूर्ण प्रवासावर भाष्य केलं आहे.
नुकतीच चिन्मय मांडलेकरनं अमोल परचुरेंच्या 'कॅचअप मराठी' या पॉडकास्टला हजेरी लावली. खरंतर, २०१८ पासून या चित्रपटावर काम करणं सुरु झालं होतं. मात्र, कोरोनामुळे आणि इतर काही कारणामुळे चित्रपट यायला उशीर झाला.याच मुलाखतीत 'इन्सपेक्टर झेंडे' मध्ये मनोज वाजपेयींसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी त्याने सांगितलं. अभिनेता म्हणाला," मनोज वाजपेयी माझ्यासाठी पहिला अभिनेता होता ज्याला पाहून कायम वाटायचं, अरे हा माणूस बिहारच्या एका छोट्याशा गावातून येऊन हे करू शकतो तर आपण का नाही करु शकतं.मनोज वाजपेयी हे नाव माझ्या वयातील अनेक तरुणांसाठी आदर्श नाव आहे. जे लोक मध्यमवर्गीय कुटुंबातून आले, ज्यांचं या क्षेत्रात कोणीही नव्हतं.पण, ज्यांना ही स्वप्नं पूर्ण कशी करावी हे माहित नव्हतं. त्यांच्यासाठी मनोज वाजपेयी हे आयकॉन आहेत."
त्यानंतर चिन्मय म्हणाला,"मी जेव्हा त्यांना गोष्ट ऐकवण्यासाठी गेलो तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं. पण, त्या माणसाइतका सहज माणूस मी बघितला नाही. ते समोरच्या माणसाला सहज करुन टाकतात. म्हणजे समोरच्या माणसाला वाटतच नाही की, आपण एका खूप मोठ्या कलाकारासोबत आहोत. ते अजूनही बिहारमधील तो मुलगा असल्यासारखं वाटतात. त्यांचा ऑरा जाणवत राहतो. तेव्हा त्यांनी सिनेमाची स्क्रिप्ट पाहिली आणि लगेच होकार दिला. फक्त त्यांनी मला एकच प्रश्न विचारला की, तू हा चित्रपट कसा बनवणार आहेस? मी त्यावर म्हणालो, सर, फन फिल्म असणार आहे. तर ते म्हणाले, ठीक आहे... मजा करूया." असं म्हणत अभिनेत्याने मनोज वाजपेयींसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला.
‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा भारतीय पोलिसांच्या कामगिरीला सलाम करणारा एक सिनेमा आहे. याची निर्मिती ओम राऊतने केली आहे. तर चिन्मय मांडलेकरने दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात लोकप्रिय अभिनेता मनोज बाजपेयींसह भालचंद्र कदम, गिरीजा ओक आणि हरीश दूधाडे हे मराठी कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये पाहायला मिळाले.