मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आवडता सिनेमा कोणता? म्हणाले "त्या चित्रपटाने माझ्या अडचणी सुद्धा वाढवल्या"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:56 IST2025-10-07T13:55:17+5:302025-10-07T13:56:24+5:30
अक्षय कुमारशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एक खास किस्सा सांगितला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आवडता सिनेमा कोणता? म्हणाले "त्या चित्रपटाने माझ्या अडचणी सुद्धा वाढवल्या"
Devendra Fadnavis & Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका विशेष कार्यक्रमात मुलाखत घेतली. ज्याची राजकीय आणि मनोरंजन जगतात मोठी चर्चा रंगली आहे. 'फिक्की फ्रेम्स २०२५' ( Ficci Frames 2025) च्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान अक्षय कुमारने ही मुलाखत घेतली. या कार्यक्रमादरम्यान अक्षयनं राजकीय घडामोडींसह सिनेसृष्टीतील आवडी-निवडींवर देवेंद्र फडणवीस यांना विविध प्रश्न विचारले. तर या प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनीही दिलखुलासपणे उत्तरे दिली. विशेष म्हणजे आपल्या आवडत्या चित्रपटानेच अडचणी वाढवल्याचं मुख्यमंत्र्यांनी गंमतीने म्हटलं. एवढंच नाही, तर 'एका दिवसासाठी चित्रपट दिग्दर्शक बनले आणि महाराष्ट्र नावाच्या चित्रपटातील पहिला सीन काय असेल' याबद्दलची मनोरंजक कल्पनाही मुख्यमंत्र्यांनी सांगितली.
अक्षयशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांचा आवडता सिनेमा हा 'नायक' (Devendra Fadnavis on Nayak Movie) असल्याचं सांगितलं. अक्षयनं मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की "असा कोणता चित्रपट आहे किंवा अशी फिल्म इंडस्ट्रीतील कोणती व्यक्ती आहे, ज्याचा तुमच्यावर प्रभाव पडला?" यावर उत्तर देताना मुख्यमंंत्री म्हणाले, "पहिली गोष्ट तर ही आहे की, एक राजकारणी म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून आमच्यातील संवेदनावर काही चित्रपट हे प्रभावित करतात. मला अनेक चित्रपटांनी प्रभावित केलं आहे. पण असा एक चित्रपट आहे, ज्यानं मी प्रभावित तर झालोच, पण त्या चित्रपटानं माझ्या अडचणीसुद्धा वाढवल्या आहेत. तो म्हणजे 'नायक' चित्रपट. मी कुठेही गेलो की, लोक पहिल्यांदा मला नायक चित्रपटातील अनिल कपूर सारखं काम करण्यास सांगतात".
देवेंद्र फडणवीस अनिल कपूर यांच्याशी झालेल्या भेटीचा किस्सा सांगताना म्हणाले, "एक दिवस मी अनिल कपूर यांना भेटलो, तेव्हा त्यांना म्हटलं की, तुम्ही 'नायक' चित्रपट का बनवला? तुम्ही 'नायक' आणि 'नालायक' असे लोकांना वाटतं. एका दिवसात एवढी कामे तुम्ही कशी केली?" असे त्यांनी गंमतीने सांगितले. तसेच नायक चित्रपटाने एक बेंचमार्क सेट केल्याचं मुख्यमंंत्र्यांनी म्हटलं.
एक राजकारणी म्हणून सिनेमा त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे देखील त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "मला असं वाटतं चित्रपटांनी माझ्या भावनांना आकार देण्याचं आणि त्यांना कायम जागृत ठेवण्याचं काम केलंय. कारण, कोणत्याही क्षेत्रात काम करताना सारख्या गोष्टी परत करताना अनेकदा तुमच्या भावना कमी व्हायला लागतात. पण, सिनेमांनी माझ्या भावना जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. मी जेव्हा एखादा सिनेमा पाहतो, त्यावेळी मी एक साधा माणूस बनतो, जो मी आहे".
एक दिवसाचे दिग्दर्शक झाला तर?
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात आणि महाराष्ट्र नावाचा चित्रपट दिग्दर्शित केलात तर कुठला सीन चित्रीत कराल? असा प्रश्न अक्षयनं मुख्यमंत्र्याना केला. यावर फडणवीस म्हणाले, "जर महाराष्ट्र हा चित्रपट असेल आणि त्यातला पहिला सीन चित्रीत करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकासाठी बसले असतील आणि इतक्या वर्षांच्या गुलामीनंतर त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं, तोच पहिला सीन असेल" असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.