"महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ...", विकी कौशलचं असं भाषण की CM फडणवीसांनीही वाजवल्या टाळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 11:25 IST2025-02-20T11:24:35+5:302025-02-20T11:25:01+5:30
विकी कौशलने केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक

"महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ...", विकी कौशलचं असं भाषण की CM फडणवीसांनीही वाजवल्या टाळ्या
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या छावा सिनेमामुळे सध्या चर्चेत आहे. विकी कौशलने १९ फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त रायगडाला भेट दिली. तसंच आग्रा येथील किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित केलेल्या 'शिवजन्मोत्सव संपूर्ण भारतवर्ष का' या विशेष कार्यक्रमातही तो उपस्थित होता. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हजर होते.
विकी कौशलने आग्रा किल्ल्यावरही या कार्यक्रमात भाषणही दिले. या भाषणात त्याने मुख्यमंत्री फडणवीस यांचा उल्लेख "महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ" असा केला.विकी कौशलने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या घोषणा देऊन त्याच्या भाषणाची सुरुवात केली.
काय म्हणाला विकी कौशल?
"नमस्कार, सगळ्यात आधी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानू इच्छितो. त्यांना आपण प्रेमाने महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊदेखील म्हणतो. थँक्यू सर...मला आणि माझ्या टीमला, निर्माते दिनेश विजन सरांना इथे येण्याची संधी दिली. हे मी माझं भाग्य समजतो. मी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करतो की गेल्या तीन वर्षांपासून तुम्ही हा कार्यक्रम करत आहात. पुढची अनेक वर्ष हा कार्यक्रम असाच सुरू राहील आणि प्रत्येक वर्षी मला या कार्यक्रमात सहभागी होता यावं, यासाठी मी प्रार्थना करेन. तुम्हा सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा. १९ फेब्रुवारी १६३० रोजी एक हे फक्त एक नाव नाही तर ही एक विचारधारा आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात लोक यापासून प्रेरणा घेतात. आणि एक भारतीय म्हणून याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे. ते केवळ एक राजा किंवा योद्धा नव्हते तर ते एक दूरदृष्टी असणारे लीडर होते".
"एका लीडरचं हेच कर्तव्य असतं की त्यांनी नेहमी पुढे राहावं. त्यावेळी बाकीचे राजा युद्धाला जाताना त्यांची फौज पुढे असायची आणि ते पाठीमागून ऑर्डर द्यायचे. पण, आपले छत्रपती शिवाजी महाराज एक असे योद्धा होते ज्यांची प्रजा पाठीमागे असायची आणि ते पुढे असायचे. कारण, दुश्मनाचा घाव राजा आधी स्वत:वर घेईल आणि मग त्यांचे मावळे घेतील. मला खूप गर्व आहे की जिथे बाकीच्या ठिकाणी काल्पनिक सुपरहिरो आहेत. तिथे मी आपल्या महाराजांना माझा सुपरहिरो मानतो. माझा आजचा दिवस खूपच स्पेशल आहे. रायगडापासून आज माझ्या दिवसाची सुरूवात झाली. त्यानंतर मला इथे येण्याची संधी मिळाली".