"नाक बदलून घे...", सुरुवातीच्या काळात माधुरीला देण्यात आला होता विचित्र सल्ला; अभिनेत्रीचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 10:08 IST2025-12-23T10:06:06+5:302025-12-23T10:08:48+5:30
Actress Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या तिच्या 'मिसेस देशपांडे' या नवीन वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. याच निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत, बॉलिवूडच्या या 'धक धक गर्ल'ने आपल्या आईकडून मिळालेली भावनिक स्थिरता, आत्मविश्वास आणि चिकाटी याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.

"नाक बदलून घे...", सुरुवातीच्या काळात माधुरीला देण्यात आला होता विचित्र सल्ला; अभिनेत्रीचा खुलासा
अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या तिच्या 'मिसेस देशपांडे' या नवीन वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. याच निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत, बॉलिवूडच्या या 'धक धक गर्ल'ने आपल्या आईकडून मिळालेली भावनिक स्थिरता, आत्मविश्वास आणि चिकाटी याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या काळातील टीकेला सामोरे जाण्यासाठी आईच्या सल्ल्याने कशी मदत केली, हे तिने आवर्जून सांगितले.
नयनदीप रक्षितशी बोलताना माधुरी दीक्षित म्हणाली, "मला वाटतं, कला मला माझ्या आईकडूनच मिळाली आहे. गाण्यावरचं प्रेम, डान्सची आवड हे सर्व तिच्यामुळेच माझ्यात आलं. ती खूप हळवी आणि भावुक होती आणि तोच गुण माझ्यातही उतरला आहे. मी देखील एक भावनिक व्यक्ती असून लोकांशी खूप लवकर जोडली जाते."
माधुरीने पुढे सांगितले की, शिस्त आणि प्रामाणिकपणा देखील तिला वारशाने मिळाला आहे. ती म्हणाली, "माझी कष्ट करण्याची सवय आईमुळेच आहे, कारण तिनेच मला हे शिकवलं. तिचा 'सेन्स ऑफ ह्युमर' माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला होता. आईमध्ये कमालीचा आत्मविश्वास होता आणि तिनेच मला शिकवलं की, तुम्ही जसे आहात तसेच राहा. कोणासारखं बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा."
सुरूवातीच्या काळात ट्रोलिंगचा करावा लागला सामना
आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगताना माधुरीने सांगितले की, तिला तिच्या लूकवरून अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. ती म्हणाली, "जेव्हा मी सुरुवात केली होती, तेव्हा अनेक लोक मला म्हणायचे की, हे कर, तुझं नाक कसं आहे, तुझं शरीर असं आहे... वगैरे वगैरे." जेव्हा अशा टीकेमुळे ती अस्वस्थ व्हायची, तेव्हा ती आईकडे जाऊन मन हलकं करायची. माधुरी पुढे म्हणाली की, "मी आईला म्हणायचं की, आई, लोक असं म्हणत आहेत. त्यावर आई म्हणायची, 'काळजी करू नकोस. एकदा का तुझा चित्रपट यशस्वी झाला की, लोक तुझ्या याच गोष्टींचं कौतुक करतील'." त्यावेळी आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं माधुरीला कठीण जात होतं, पण तिच्या आईने तिला नेहमीच धीर दिला.
'तेजाब'नंतर आयुष्यच बदललं
'तेजाब' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सगळी परिस्थिती कशी बदलली, हे सांगताना माधुरी म्हणाली, "तेजाब सुपरहिट झाल्यानंतर कोणीही माझ्या बारीक असण्याबद्दल किंवा इतर कोणत्याही गोष्टीबद्दल बोललं नाही. लोकांनी मला मी जशी आहे तसंच स्वीकारलं." आजच्या तरुण अभिनेत्रींना सल्ला देताना माधुरी म्हणते, "आजही मी नवीन अभिनेत्रींना हेच सांगते की, ठराविक साच्यात बसण्याचा प्रयत्न करू नका. एक हिरोईन अशीच दिसली पाहिजे, असा विचार करू नका. जर तुम्ही इतरांपेक्षा वेगळ्या असाल, तर तीच तुमची खासियत आहे. त्याचा आनंद घ्या."