रिलीजआधी सेन्सॉरची कात्री! 'धुरंधर २' मध्ये झालाय 'हा' मोठा बदल, सिनेमाची लांबी कमी झालीच, शिवाय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:27 IST2026-03-18T13:23:02+5:302026-03-18T13:27:45+5:30
रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर २' हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडला आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाने (CBFC) या चित्रपटाला 'A' प्रमाणपत्र दिले असले तरी, त्यापूर्वी निर्मात्यांना अनेक मोठे बदल आणि कट्स सुचवले आहेत

रिलीजआधी सेन्सॉरची कात्री! 'धुरंधर २' मध्ये झालाय 'हा' मोठा बदल, सिनेमाची लांबी कमी झालीच, शिवाय...
रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर २' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच सेन्सॉरच्या कात्रीत सापडला आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाने (CBFC) या चित्रपटाला 'A' प्रमाणपत्र दिले असले तरी, त्यापूर्वी निर्मात्यांना अनेक मोठे बदल आणि कट्स सुचवले आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या या कारवाईमुळे चित्रपटाची लांबी तब्बल ६ मिनिटांनी कमी झाली असून, अनेक हिंसक दृश्यांवर कात्री चालवण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर २' चित्रपटातील एका अत्यंत हिंसक अशा 'शिरच्छेदाच्या' दृश्यावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे हे दृश्य चित्रपटातून पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय, चित्रपटातील काही संवाद आणि अश्लील शब्दांवरही सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आहे. काही विशिष्ट समुदायांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून काही संवादांमध्ये बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः रक्तपात असलेली दृश्य आणि हिंसाचार असलेली दृश्य काढून टाकायला सांगितली आहेत.
सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयाचा निर्मात्यांनी स्वीकार केला आहे. त्यांनी नियमांनुसार सिनेमात बदल करण्यास संमती दर्शवली आहे. ६ मिनिटांच्या या कट्समुळे मूळ कथानकावर फारसा परिणाम होणार नाही, असा दावा निर्मात्यांकडून केला जात आहे. मात्र, 'धुरंधर'च्या पहिल्या भागाप्रमाणेच या भागातही भरपूर ॲक्शन असेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती, त्यामुळे प्रेक्षकांची काहीशी निराशा झाली आहे. कारण जी दृश्य ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली होती ती सिनेमात दिसली नाहीत तर प्रेक्षकांचा रसभंग होईल यात शंका नाही.
रणवीर सिंगचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट आता काही बदलांसह चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. सेन्सॉरच्या या कात्रीनंतर प्रेक्षक या चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. चित्रपटात रणवीरसोबतच अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असून, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काय कमाल करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.