अलविदा चांदनी...! श्रीदेवी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, हजारोंच्या गर्दीने साश्रूनयनांनी दिला निरोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 17:44 IST2018-02-28T08:34:13+5:302018-02-28T17:44:31+5:30

गत पाच दशके चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री श्रीदेवी आज बुधवारी अनंतात विलीन झाली. आपल्या या लाडक्या अभिनेत्रीला चाहत्यांनी ...

Bye moonlight ...! Sridevi invents death, government funeral funeral, thousands of devotees give good wishes! | अलविदा चांदनी...! श्रीदेवी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, हजारोंच्या गर्दीने साश्रूनयनांनी दिला निरोप!

अलविदा चांदनी...! श्रीदेवी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, हजारोंच्या गर्दीने साश्रूनयनांनी दिला निरोप!

पाच दशके चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री श्रीदेवी आज बुधवारी अनंतात विलीन झाली. आपल्या या लाडक्या अभिनेत्रीला चाहत्यांनी अतिशय शोकाकुल वातावरणात साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीदेवींचे पती बोनी कपूर आणि दोन्ही मुली जान्हवी व खुशी तसेच संपूर्ण कपूर कुटुंबीय यावेळी हजर होते. सर्वप्रथम श्रीदेवींना गार्ड आॅफ आॅनर देण्यात आला. बोनी कपूर यांनी श्रीदेवींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

श्रीदेवींना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातील चाहते आज सकाळीच मुंबईत दाखल झाले होते. साडेचारच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा विलेपार्ले स्मशानभूमीत पोहोचली त्यावेळी याठिकाणी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. ही गर्दी आवरणे पोलिसांनाही अशक्य झाले होते. अखेर गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. श्रीदेवींची अखेरचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी केलेल्या गर्दीमुळे अनेक बॉलिवूड स्टार्स अंत्यसंस्काराला पोहोचू शकले नाहीत.  शाहरूख खान,अमिताभ बच्चन, जावेद अख्तर, अनुपम खेर, अनिल अंबानी आदी दिग्गजांनी अंत्यसंस्काराला हजेरी लावली.
 सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये सकाळी ९.३० वाजतापासून श्रीदेवींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. याठिकाणी बॉलिवूडचे सेलिब्रिटी आणि असंख्य चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. दुपारी १ वाजता त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे रवाना झाली. तत्पूर्वी श्रीदेवींचे पार्थिव लाल साडी, कुंकू अशा सौभाग्यलंकारांनी नव्या नवरीसारखे सजवण्यात आले. यानंतर राजकीय सन्मानात त्यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आले.
गत शनिवारी दुबईच्या एका हॉटेलात श्रीदेवींनी अंतिम श्वास घेतला. बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाह याच्या विवाहासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या. २४ फेब्रुवारी रोजी हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. सुमारे अडीच दिवसांच्या चौकशीनंंतर दुबई पोलिसांनी पार्थिव कुटुंबीयांकडे सोपवले. औपचारिकता पूर्ण करून बोनी व अर्जुन कपूर सायंकाळी ७ वाजता दुबईतून निघाले होते. श्रीदेवी यांचे पार्थिव काल मंगळवारी रात्री सुमारे साडेदहा वाजता त्यांच्या लोखंडवालास्थित निवासस्थानी आणले गेले. ही माहिती मिळताच कपूर कुटुंबीयांचे आप्तेष्ट तसेच शेकडो चाहत्यांनी गर्दी केली होती.

 

UPDATEs

श्रीदेवींची अंत्ययात्रा  पवनहंसजवळील विलेपार्ले स्मशानभूमीत दाखल झाली आहे. श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यविधी सुरू, तामिळनाडूतील पंडितांकडून सुरू झाला अंत्यविधी. बुधवारी सकाळी ९.३० पासून  सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले गेले. शेकडो चाहत्यांनी आपल्या या लाडक्या अभिनेत्रीचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर तिरंग्यात लपटलेले त्यांचे पार्थिव विलेपार्ले स्मशानभूमीच्या दिशेने रवाना झाले.  या मार्गात शेकडो चाहत्यांनी श्रीदेवींना साश्रूनयनांनी श्रद्धांजली वाहिली. तूर्तास श्रीदेवींची अंत्ययात्रा विलेपार्ले स्मशानभूमीत दाखल झाली आहे. काहीच क्षणात याठिकाणी श्रीदेवींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

स्मशानभूमीबाहेर चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे. सुमारे पाच दशके निखळ मनोरंजन करणाºया या लाडक्या अभिनेत्रीची अखेरची एक झलक पाहण्यासाठी गर्दी अधीर झाली आहे. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागतोय.



शाहरूख खानपासून तर प्रसून जोशींपर्यंत अनेक सेलिब्रिटी स्मशानभूमीवर पोहोचले आहेत. सेलिब्रिटीशन स्पोर्ट्स क्लबयेथून निघालेली श्रीदेवींची अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचण्यासाठी १ तास ४० मिनिटे लागलीत.






अंत्ययात्रेचा रथ पांढ-या मोग-यांच्या फुलांनी सजवण्यात आला आहे. श्रीदेवींना मोग-याची फुले फार आवडायची. पांढरा रंगही त्यांना खूप आवडायचा. मला मोगºयाच्या पांढºया फुलांसोबत अंतिम निरोप देण्यात यावा, अशी इच्छा त्यांनी कधीतरी बोलून दाखवली होती. त्यांची ही अंतिम इच्छा पूर्ण करत त्यांच्या अंत्ययात्रेचा रथ खास मोगºयाच्या फुलांनी सजवण्यात आला आहे. या रथातून कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी श्रीदेवी अनंताच्या प्रवासाला निघाली आहे. 
अंत्ययात्रेच्या रथावर श्रीदेवींच्या पार्थिवाशेजारी बेनी कपूर, दोन्ही मुली जान्हवी व खुशी उभे आहेत. अर्जुन कपूरही वडिलांच्या बाजूने उभा आहे. काहीच वेळात पवनहंसजवळील विलेपार्ले स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.  





 पवनहंसजवळील विलेपार्ले स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 


 

 

ALSO READ : SEE PICS : हेमा मालिनींपासून ऐश्वर्यापर्यंत श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले सेलिब्रिटी!

दुबईतील सगळा तपास पूर्ण झाल्यानंतर काल रात्री उशीरा त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले. यानंतर विमानतळावरून ते थेट त्यांच्या लोखंडवालास्थित ग्रीन एकर्स येथे ठेवण्यात आले. आज सकाळी ९ वाजून ९ मिनिटाला श्रीदेवींचे पार्थिव जवळच्याच सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये आणण्यात आले. 

Web Title: Bye moonlight ...! Sridevi invents death, government funeral funeral, thousands of devotees give good wishes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.