Box Office Clash: बॉक्सआॅफिसवर रंगणार ‘केदारनाथ’ vs ‘अॅक्वामॅन’चा सामना!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 16:22 IST2018-10-30T16:21:12+5:302018-10-30T16:22:33+5:30
दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी ‘केदारनाथ’ची ७ डिसेंबर ही रिलीज डेट जाहिर केली आणि या रिलीज डेटसोबतच बॉक्सआॅफिसवर ‘केदारनाथ’ आणि ‘अॅक्वामॅन’ या हॉलिवूडपटाचा संघर्षही पक्का झाला.

Box Office Clash: बॉक्सआॅफिसवर रंगणार ‘केदारनाथ’ vs ‘अॅक्वामॅन’चा सामना!!
सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूत यांचा ‘केदारनाथ’ हा चित्रपट येत्या ७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. निर्माता-दिग्दर्शकातील वादामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ‘केदारनाथ’ रखडला होता. या काळात चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. पण आता दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी स्वत: टिष्ट्वटरवर चित्रपटाची ७ डिसेंबर ही रिलीज डेट जाहिर केली आहे आणि या रिलीज डेटसोबतच बॉक्सआॅफिसवर ‘केदारनाथ’ आणि ‘अॅक्वामॅन’ या हॉलिवूडपटाचा संघर्षही पक्का झाला आहे. होय, कारण ‘अॅक्वामॅन’ही नेमक्या ७ तारखेलाच रिलीज होतोय. आधी ‘अॅक्वामॅन’ हा हॉलिवूडपट शाहरूख खानच्या ‘झिरो’सोबत म्हणजेच २१ डिसेंबरला रिलीज होणार होता. पण अचानक या चित्रपटाची रिलीज डेट २१ वरून ७ डिसेंबर करण्यात आली. त्यामुळे बॉक्सआॅफिसवर ‘केदारनाथ’ विरूद्ध ‘अॅक्वामॅन’ हा सामना पक्का मानला जात आहे. आता या सामन्यात कोण बाजी मारणार, हे तूर्तास तरी सांगता येणार नाही. कारण दोन्हीही चित्रपट तोडीस तोड आहेत.
‘अॅक्वामॅन’चा ट्रेलर रिलीज झालाय आणि सोशल मीडियावर या ट्रेलरला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. याऊलट आजच रिलीज झालेल्या ‘केदारनाथ’च्या टीजरलाही सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे बॉक्सआॅफिसवर अगदी काट्याची टक्कर होणार आहे.
‘केदारनाथ’ या चित्रपटाने सुरूवातीला बरेच वाद ओढवून घेतले. निर्माती प्रेरणा अरोरा आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्यातील वाद कोर्टापर्यंत पोहोचला. हा वाद इतका विकोपाला गेला होता की, चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होत. शूटिंग सुरू असतानाच प्रेरणाने निर्मितीतून माघार घेतल्याने अभिषेकसमोर मोठा पेच उभा राहिला होता. अखेर रॉनी स्क्रूवालाने निर्मितीची जबाबदारी स्विकारली आणि ‘केदारनाथ’चा मार्ग सुकर झाला. आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.