बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र ICU मध्ये दाखल; श्वास घ्यायला होतोय त्रास, सनी-बॉबी घेताहेत काळजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:04 IST2025-11-01T12:03:19+5:302025-11-01T12:04:32+5:30
Dharmendra admitted to ICU : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र ICU मध्ये दाखल; श्वास घ्यायला होतोय त्रास, सनी-बॉबी घेताहेत काळजी
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ८९ वर्षीय हे दिग्गज अभिनेते गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून, त्यांच्या काही तपासण्या करायच्या असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
ब्रीच कँडी रुग्णालयाच्या एका कर्मचाऱ्याने विक्की लालवानी यांना सांगितले, "धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार होती. ते सध्या आयसीयूमध्ये असून आराम करत आहेत." सध्या वरिष्ठ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. दोन्ही मुले, अभिनेते सनी देओल आणि बॉबी देओल, रुग्णालयात त्यांच्यासोबत असून त्यांची काळजी घेत आहेत.
सनी आणि बॉबी घेताहेत काळजी
धर्मेंद्र यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आणले गेले होते, पण काही अतिरिक्त तपासण्यांची गरज असल्याने त्यांना दाखल करून घेण्यात आले आहे. त्यांच्या डिस्चार्जबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी अभिनेत्याच्या तब्येतीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, ''सध्या कोणतीही चिंतेची बाब नाहीये. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांचे पॅरामीटर्स ठीक आहेत. हार्टबीट ७० आहे. ब्लडप्रेशर १४०/८० आहे. त्यांचा युरिन सॅम्पल देखील ठीक आहेत.'' डॉक्टरांनी त्यांना देखरेखीखाली राहण्याचा सल्ला दिला आहे. पण डिस्चार्जची तारीख सांगितलेली नाही. त्यांचे दोन्ही मुलगे त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांनी कामाचे कमिटमेंट्स पुढे ढकलले आहेत.
धर्मेंद्र यांचे आगामी चित्रपट
अभिनेते धर्मेंद्र डिसेंबरमध्ये आपला ९० वा वाढदिवस साजरा करतील. ते गेल्या काही वर्षांपासून आरोग्य समस्यांशी झुंज देत आहेत. एप्रिल २०२५ मध्ये त्यांनी मोतिबिंदूची शस्त्रक्रिया केली होती आणि ते बरेही झाले होते. या वयातही ते वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात सक्रीय आहेत. त्यांना शेवटचे २०२४ मध्ये आलेल्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'मध्ये पाहिले होते. या व्यतिरिक्त ते श्रीराम राघवन दिग्दर्शित 'इक्कीस' या चित्रपटात दिसतील. यात अगस्त्य नंदा आणि सिमर भाटिया आहेत. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होईल.