इकडे लोक शोधत राहिले, बॉलिवूडचा टार्झन मात्र दारुच्या नशेत हॉटेलमध्ये पडलेला; रामलीलामधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 18:34 IST2025-10-13T18:33:54+5:302025-10-13T18:34:34+5:30
हेमंत बिरजेला उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये महर्षी वाल्मिकी महोत्सव समितीद्वारे आयोजित केलेल्या रामलीलामध्ये परफॉर्म करायचं होतं. मात्र तो उपस्थितीतच राहिला नाही.

इकडे लोक शोधत राहिले, बॉलिवूडचा टार्झन मात्र दारुच्या नशेत हॉटेलमध्ये पडलेला; रामलीलामधील प्रकार
बॉलिवूडचा टार्झन म्हणून ओळख मिळवलेला अभिनेता हेमंत बिरजे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अॅडव्हेंचर्स ऑफ टार्झन, वीराना, तहखाना, मर्दानगी, सूरज, सिंदूर की बंदूक, प्यार के नाम कुरबान अशा अनेक सिनेमांमध्ये काम करून हेमंतने बॉलिवूडमध्ये बस्तान बसवलं होतं. मात्र, नंतर त्याची जादू चालली नाही. तरीदेखील अजूनही हेमंत इंडस्ट्रीत सक्रिय आहे. पण, आता मात्र त्याच्याबाबत वेगळीच बातमी समोर आली आहे.
हेमंत बिरजेला उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये महर्षी वाल्मिकी महोत्सव समितीद्वारे आयोजित केलेल्या रामलीलामध्ये परफॉर्म करायचं होतं. त्यासाठी त्याला ९० हजरा रुपये देण्यात येणार होते. हेमंत रामलीलामध्ये परफॉर्म करण्यासाठी मुंबईहून अलीगढला तर पोहोचला. पण, तो परफॉर्म करायला गेलाच नाही. जेव्हा आयोजक हॉटेलमध्ये काय झालं ते पाहण्यासाठी पोहोचले तेव्हा हेमंत त्यांना दारुच्या नशेत रुममध्ये पडलेला दिसला.
जेव्हा आयोजकांनी हेमंतकडे पैसे मागितले तेव्हा अभिनेत्याने वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेलं आहे. रिपोर्टनुसार, हेमंत ११ ऑक्टोबरला मुंबईहून दिल्लीसाठी फ्लाइट पकडणार होता. मात्र उशीर झाल्यामुळे त्याची फ्लाइट सुटली. त्यानंतर २५ हजार रुपये देऊन त्याच्यासाठी दुसऱ्या फ्लाइटचं बुकिंग करण्यात आलं होतं. त्यानंतर तो दिल्लीवरुन त्याच्या तीन मित्रांसह अलीगडला पोहोचला. त्याला रात्रा ८ वाजता कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं. आयोजकांनी खूप प्रयत्न करूनही हेमंत कार्यक्रमात सहभागी झाला नाही. आयोजकांनी अॅडव्हान्स आणि तिकीटाचे पैसे परत मागितले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्याने ५० हजार रुपये देणार असल्याचं सांगितलं आहे.