गाणं सुपरडुपर हिट, पण मानधन म्हणून अवघे...; 'कजरारे' गाण्यावरून अलिशा चिनॉय यांचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 10:55 IST2025-10-07T10:47:45+5:302025-10-07T10:55:14+5:30
गाणं सुपरहिट पण मानधन फक्त...; अलिशा चिनॉय यांचं 'कजरारे' च्या वादावर भाष्य, म्हणाल्या...

गाणं सुपरडुपर हिट, पण मानधन म्हणून अवघे...; 'कजरारे' गाण्यावरून अलिशा चिनॉय यांचा धक्कादायक खुलासा
Alisha Chinai On Kajra Re Fees: हिंदी सिनेविश्वात रॉक आणि पॉप म्युझिकला काही कलाकारांमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. त्यातीलच एक नाव म्हणजे अलिशा चिनॉय. सध्या अलिशा इंडस्ट्रीत फारशा सक्रिय नसल्या तरी त्यांची गाणी अनेकांच्या प्ले-लिस्टचा भाग असल्याची भाग पाहायला मिळतात.'मेड इन इंडिया' या अल्मबसाठी ही गायिका आजही ओळखली जाते.अलिशा चिनॉय यांनी अनेक चित्रपटांमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. त्यांनी प्रत्येक नायिकेसाठी गाणी गायली. त्यातीलच 'बंटी और बबली' चित्रटातील त्यांचं गाजलेलं गाणं म्हणजे कजरा रे! या सुपरहिट गाण्याला त्यांनी आपला आवाज दिला.
अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यावर चित्रित केलेलं कजरा रे हे गाणं सुपरडुपरहिट ठरलं. या सुपरहिट गाण्यासाठी त्यांना फिल्म फेअरच्या सर्वोत्कृष्ट गायिकेच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. मात्र,या गाण्यासाठी निर्मात्यांकडून त्यांना योग्य मानधन देण्यात आलं नाही, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. अलिकडेच झुमला दिलेल्या मुलाखतीमध्ये अलिशा चिनॉय यांनी याबद्दल खुलासा केला आहे. या मुलाखतीमध्ये कजरा रे गाण्याचा तो किस्सा सांगताना म्हणाल्या,"मला खूप वाईट वाटलं. एक यशस्वी गायिका असूनही त्यांनी मला अगदीच कमी मानधन दिलं होतं. त्या गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता कारण, मी त्यांच्यावर खूप नाराज होते.एका कलाकाराची त्यांच्या मते काहीच किंमत नव्हती. एकेदिवशी घरी असताना मला त्यांचा फोन आला. सुरुवातीला मी हे गाणं गाणार नव्हते. पण, शंकर, एहसान आणि लॉय यांनी मला कॉल केला आणि मग मी तयार झाले."
त्यादरम्यान, 'कजरारे' गाण्यासाठी अलिशा चिनॉय यांना फक्त १५ हजार रुपये इतकं मानधन देण्यात आलं होतं, असं म्हटलं जातं. त्यावर स्पष्टीकरण देत त्या म्हणाल्या,"मी विचार केला होता की यशराज बॅनरचं गाणं आहे तर आपण ते करावं. पण, जेव्हा माझ्या हातात चेक आला तेव्हा मला धक्काच बसला. तो चेक मी घेतला नाही.पण तरीही ते चेक पाठवत होते. त्यावेळी मी थोडी वयाने लहान होते परंतु, मला जे योग्य वाटलं ते मी केलं. जे काही होतं ते मी बोलून मोकळी झाले." असा खुलासा त्यांनी केला.
अलिशा चिनॉय यांनी आपल्या कारकिर्दीत बड्या संगीत दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. नाचेंगे (राजा हिंदुस्तानी),रुक रुक रुक (विजयपथ),दे दिया (किमत), छा रहा प्यार का नशा (चंद्रमुखी)यांसारख्या चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.