बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवालाच्या घरावर NCBचा छापा, ड्रग्जसोबत जप्त केल्या या वस्तू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 16:04 IST2020-11-08T16:04:21+5:302020-11-08T16:04:45+5:30
ड्रग्ज कनेक्शन, लवकरच चौकशीसाठी समन्स

बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवालाच्या घरावर NCBचा छापा, ड्रग्जसोबत जप्त केल्या या वस्तू
बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. या प्रकरणात बॉलिवूडच्या अनेक दिग्गज नट्या एनसीबीच्या रडारवर आल्या होत्या. आता ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. एनसीबीने काल रात्री मोठी कारवाई करत फिरोज नाडियाडवाला यांच्या घरी धाड टाकून ड्रग्ज जप्त केले आहे.
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाडियाडवाला यांच्या घरातून 10 ग्रॅम गांजा व तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. एनसीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली 5 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. लवकरच एनसीबी नाडियाडवाला चौकशीसाठी समन्स बजावणार असल्याचे कळतेय.
दोन दिवसांपासून एनसीबीने अनेक ड्रग्ज पेडलर्सच्या घरी छापेमारी केली होती. या प्रकरणी एनसीबीने आतापर्यंत पाच ड्रग डिलर्सना ताब्यात घेतले आहे. या ड्रग डिलर्सच्या चौकशीदरम्यान नाडियाडवाला यांचे नाव समोर आल्याचे कळते.
फिरोज नाडियाडवाला हे बॉलिवूडचे मोठे नाव आहे. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. यात फिर हेराफेरी, आवारा पागल दीवाना, फूल अॅण्ड फायनल, वेलकम, कारतूस या चित्रपटांचा समावेश आहे.
सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने या प्रकरणाची धडक कारवाई करत, रिया चक्रवर्तीला अटक केली होती. तिच्यासोबत तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती व अन्य लोकांना अटक केली होती. रिया चक्रवर्तीची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र तिचा भाऊ शौविक अद्यापही तुरुंगात आहे. यापाठोपाठ एनसीबीने दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग या अभिनेत्रींना समन्स बजावत त्यांची चौकशी केली होती. काही दिवसांपूर्वी एनसीबीने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचा भाऊ अॅगिसिओस डेमेट्रिएडस याला अटक केली होती.