गोविंदा खरंच सेटवर लेट यायचा? दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी खरं काय ते सांगितलं, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 11:07 IST2026-03-16T11:04:38+5:302026-03-16T11:07:58+5:30
गोविंदासोबत १७ सिनेमे केले अन् सगळेच सुपरहिट! अभिनेत्याच्या सेटवर लेट येण्याच्या सवयींबद्दल डेव्हिड धवन खुलासा, काय म्हणाले?

गोविंदा खरंच सेटवर लेट यायचा? दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी खरं काय ते सांगितलं, म्हणाले...
David Dhawan On Govinda: बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी दिग्दर्शक म्हणून डेव्हिड धवन यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी आजवर प्रेक्षकांसाठी एकापेक्षा एक उत्तम विनोदी चित्रपटांची निर्मिती केली. विशेषत ९० च्या दशकात त्यांची आणि गोविंदाची जोडी चांगली जमली. गोविंदाबरोबर त्यांनी केलेले बरेच सिनेमे हिट ठरले. बिवी नं १, क्योंकी में झुठ नहीं बोलता, राजा बाबू, कुली नंबर-१ या सिनेमांचा समावेश आहे. या जोडीने एकत्रितपणे तब्बल १७ ते १८ सुपरहिट चित्रपट दिले असून त्यांच्यातील मैत्री आजही कायम आहे. मात्र, काही काळापासून गोविंदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. याचदरम्यान, अभिनेत्याविरोधात अनेक चर्चा सुरु झाल्या. सेटवर उशिरा पोहोचायचा, ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीवरही परिणाम झाला.
पण, गोविंदा खरोखरच सेटवर उशिरा पोहोचला का? दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी याबद्दल स्पष्टच सांगितलं आहे. अलिकडेच डेव्हिड धवन आपल्या दोन्ही मुलांसह, म्हणजेच वरुण धवन आणि रोहित धवन यांच्यासोबत 'द ग्रेट इंडियन कपिल' शोमध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात कपिल शर्माने जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी डेव्हिड धवन यांना गोविंदाच्या सेटवर उशिरा येण्याच्या सवयीबाबत प्रश्न विचारला, तेव्हा डेव्हिड धवन यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. ते म्हणाले, डेव्हिड धवन म्हणाले, "मी गोविंदासोबत १७ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मला वाटतं की गोविंदा हा मी आतापर्यंत काम केलेल्या सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे."
मग ते म्हणाले, "गोविंदा सेटवर उशिरा यायचा, परंतु त्याचे काम पाहून कोणाचीही तक्रार उरायची नाही. डेव्हिड म्हणाले की, गोविंदा हा कॅमेऱ्यासमोरचा एक विलक्षण जादूगार आहे. मला एवढंच सांगायचं आहे की, लोक म्हणतात तो सेटवर उशिरा येतो. आजकाल कोण उशिरा येत नाही? तो सेटवर येतो, त्याचं काम पूर्ण करतो आणि निघून जातो."
त्यानंतर पुढे डेव्हिड धवन यांनी 'पार्टनर' चित्रपटातील एक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितलं, " त्यावेळी गोविंदा सेटवर आला आणि त्याने सीनबद्दल विचारलं. तो सीन जवळजवळ चार पानांच्या होता. त्याने मग तो सीन पाहिल्यानंतर सेटअप करू नका असं सांगितलं. मी हा सीन एकाच टेकमध्ये करेन, असं तो म्हणाला. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, अशा पद्धतीने त्याने तो सीन केला. त्यानंतर तो मला म्हणाला, तुम्हाला पाहिजे तसा सीन एडिट करा. अविश्वसनीय. गोविंदा एक कमालीचा अभिनेता आहे. असं म्हणत दिग्दर्शकाने त्याला पाठिंबा दर्शवला.
डेव्हिड धवन लवकरच "है जवानी तो इश्क होना है" हा एक नवीन विनोदी चित्रपट घेऊन येत आहेत. जो १२ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांचा मुलगा वरुण मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय चित्रपटात मृणाल ठाकूर, मौनी रॉ, पूजा हेगडे या अभिनेत्रींच्या देखील भूमिका आहेत.