अक्षय कुमारमुळे चंकी पांडेला विदेशात घासावी लागली भांडी; चारचौघात झाला अभिनेत्याचा अपमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 14:36 IST2023-11-02T14:35:52+5:302023-11-02T14:36:35+5:30
Chunky panday: इटलीमधील एका रेस्टॉरंटमध्ये चंकी पांडेने सगळ्या ग्राहकांची भांडी घासली होती.

अक्षय कुमारमुळे चंकी पांडेला विदेशात घासावी लागली भांडी; चारचौघात झाला अभिनेत्याचा अपमान
बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) सध्या OMG 2 या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच हा सिनेमा रिलीज झाला त्यामुळे या सिनेमाविषयीचे अनेक किस्से सध्या चर्चिले जात आहेत. यामध्येच अक्षय कुमार आणि चंकी पांडे (Chunky panday) यांचा एक भन्नाट किस्सा समोर आला आहे. अक्षय कुमारच्या मस्तीखोर स्वभावामुळे चंकी पांडेला चक्क इटलीमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये भांडी घासावी लागली होती.
अक्षय कुमार आणि चंकी पांडे यांनी साधारणपणे एकाच वेळी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. त्यामुळे या दोघांची बऱ्याच वर्षांपासून एकमेकांसोबत चांगली मैत्री आहे. एकाच अॅक्टिंग स्कूलमध्ये शिकलेल्या या जोडीने २०१० मध्ये हाऊसफूल या सिनेमात एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमाचं इटलीमध्ये शुटिंग झालं होतं. विशेष म्हणजे याच ठिकाणी एका रेस्टॉरंटमध्ये चंकी पांडेने भांडी घासली होती.
नेमका काय घडला किस्सा?
चंकी पांडेने 'द कपिल शर्मा शो' मध्ये हा मजेशीर किस्सा सांगितला. "सिनेमाचं शुटिंग संपल्यानंतर आम्ही सगळे जण एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो. त्यावेळी ज्याला जे खायचंय त्याने ते ऑर्डर करा, आजचं बील मी देतो असं अक्षयने सगळ्यांना सांगितलं. सगळे जेवायला बसले, सगळं सुरळीत सुरु होतं. पण, मी जसा उठून वॉशरुमला गेलो आणि परत आलो तर त्यावेळी आमच्या टीमपैकी कोणीच नव्हतं. सगळे जण मला त्या हॉटेलमध्ये सोडून व्हॅनमध्ये बसले होते. मी वॉशरुममधून बाहेर आल्यानंतर त्या रेस्टॉरंटचा मॅनेजर सगळ्यांना शोधत होता. त्याने मला पाहिलं आणि माझ्याकडे बील मागायला लागला", असं चंकी पांडे म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "त्यावेळी माझ्याकडे एवढे पैसे नव्हते की मी बील देऊ शकतो. त्यामुळे मी बील न भरु शकल्यामुळे त्याने मला सरळ किचनमध्ये नेलं आणि माझ्याकडून भांडी घासून घेतली. त्यानंतर काही वेळाने साजिद नाडियादवाला आणि साजिद खान आले त्यांनी बील भरलं आणि माझी सुटका केली."