'रंग दे बसंती' प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्मात्यांनी मानधनाचे पैसे परत मागितलेले! सोहा अली खानचा धक्कादायक खुलासा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 12:18 IST2025-09-22T12:02:17+5:302025-09-22T12:18:25+5:30
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्मात्यांनी मानधनाचे पैसे परत मागितले अन्..., प्रसिद्ध अभिनेत्री खुलासा, काय होतं कारण?

'रंग दे बसंती' प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्मात्यांनी मानधनाचे पैसे परत मागितलेले! सोहा अली खानचा धक्कादायक खुलासा, म्हणाली...
Soha Ali Khan: प्रसिद्ध दिग्दर्शक ओम प्रकाश मेहरा यांचा रंग दे बसंती हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाती त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. आमिर खान, आर.माधवन, कुणाल कपूर आणि शर्मन जोशी,सोहा अली खान या तगड्या कलाकारांची फळी चित्रपटात पाहायला मिळाली. तरुणांमध्ये देशभक्ती जागवणा-या या सिनेमाला समीक्षक आणि प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल याबद्दल चक्क निर्मात्यांनाही खात्री नव्हती. याबद्दल अभिनेत्री सोहा अली खानने इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच खुलासा केला आहे.
अलिकडेच सोहा अली खानने दिलेल्या मुलाखतीत रंग दे बसंतीच्या शूटिंगपासून ते अनेक किस्से शेअर केले आहेत. मुलाखतीत सोहा अली खानने सांगितलं की, रंग दे बसंतीच्या निर्मात्यांनी कलाकारांना पैसे परत करण्यास सांगितले होते कारण त्यांना खात्री नव्हती की चित्रपट यशस्वी होईल की नाही. 'झुम'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली," कोणीही विचार केला नव्हता की चित्रपट इतका चालेल किंवा लोकांना तो इतका आवडेल. खरं सांगायचं झालं तर, जेव्हा आम्ही चित्रपटाचं प्रमोशन करत होतो, तेव्हा निर्मात्यांनी आम्हाला फोन केला होता. त्यानंतर आम्ही सर्वांनी पैसे परत केले. कदाचित त्यांचं म्हणणं योग्य असेल असं आम्हालाही वाटत होतं.पण त्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट माझ्या करिअरमध्ये एक टर्निंग पॉइंट ठरला. "
चित्रपटाच्या शूटिंगचे किस्से सांगत म्हणाली...
यापुढे अभिनेत्री म्हणाली, "आम्ही जवळजवळ एक वर्ष शूट केलं. त्यानिमित्ताने आम्ही संपूर्ण भारतात फिरलो. त्यामुळे सेटवरील प्रत्येक टीम मेंबर तसंच कलाकारासोबत छान बॉण्डिंग झालं होतं. आमचे सिनेमॅटोग्राफर, विनोद प्रधान एक सीन लावण्यासाठी खूप मेहनत करायचे, त्यासाठी आम्ही अनेकदा तासन्तास वाट पाहायचो पण ते योग्यच होतं. कधीकधी तर एका सीनसाठी अगदी अर्धा दिवसही लागायचा. त्यादरम्यान आम्ही एक युनिट म्हणून बराच वेळ एकत्र घालवला.आम्ही मित्र झालो आणि त्यावेळी आम्हाला वाटलं होतं की आम्ही कायमचे मित्र राहू. पण आता असं वाटतं की, आम्ही आयुष्यात कधी बोललोच नाही. मात्र, कालांतराने मला कळलं की अशा गोष्टी कायमस्वरुपी नसतात." असा खुलासा अभिनेत्रीने केला.