बॉलिवूडच्या 'स्त्री'ची थेट हॉलिवूडमध्ये एन्ट्री! ऑस्कर विजेत्या सिनेमासाठी काम करणार श्रद्धा कपूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 11:19 IST2025-11-08T11:16:57+5:302025-11-08T11:19:23+5:30
अभिनेत्री श्रद्धा कपूरला हॉलिवूडचा मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे

बॉलिवूडच्या 'स्त्री'ची थेट हॉलिवूडमध्ये एन्ट्री! ऑस्कर विजेत्या सिनेमासाठी काम करणार श्रद्धा कपूर
बॉलिवूडमध्ये आपल्या मोहक अभिनयाने, याशिवाय 'स्त्री' आणि 'स्त्री २' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आता थेट हॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. डिस्नेच्या ऑस्कर विजेत्या 'झूटोपिया' (Zootopia) फ्रेंचायजीच्या सिक्वलसाठी श्रद्धाने मुख्य भूमिकेसाठी हिंदी व्हॉईस-ओव्हर दिला आहे. श्रद्धाने सोशल मीडियावर पोस्ट करुन ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली
जुडी हॉप्ससाठी श्रद्धाचा आवाज
श्रद्धा कपूर 'झूटोपिया २' मध्ये प्रमुख पात्र असलेल्या उत्साही, धाडसी आणि प्रेमळ ससा अर्थात जुडी हॉप्सला हिंदीमध्ये आवाज देणार आहे. या भूमिकेसाठी श्रद्धाची निवड तिच्या चाहत्यांसाठी एक मोठं सरप्राइज आहे. या नव्या प्रवासावर आनंद व्यक्त करताना श्रद्धा म्हणाली की, "जुडी हॉप्ससारख्या बहादूर आणि गोड व्यक्तिरेखेला आपला आवाज देणं माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखं आहे."
डिस्ने इंडियाने या बातमीला दुजोरा दिला आहे की 'झूटोपिया २' (Zootopia 2) हा चित्रपट केवळ इंग्रजीमध्येच नव्हे, तर हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्येही २८ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतामध्ये प्रदर्शित होणार आहे. 'झूटोपिया'चा पहिला भाग २०१६ मध्ये आला होता, ज्याने ऑस्कर पुरस्कार जिंकला होता. दुसऱ्या भागात, जुडी हॉप्स आणि तिचा साथीदार निक वाईल्ड हे दोघेही 'झूटोपिया' शहरात नवीन संकटांचा सामना करताना दिसतील. या ॲनिमेशन चित्रपटाचे दिग्दर्शन जारेड बुश आणि जोसी ट्रिनिडॅड यांनी केले आहे. त्यामुळे बॉलिवूडची स्त्री आता थेट हॉलिवूडमध्ये दिमाखात एन्ट्री घेत आहे.