सार्वजनिक कार्यक्रमात घेतलेल्या चुंबनप्रकरणी खटला रद्द करण्यासाठी शिल्पा शेट्टी उच्च न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 06:36 IST2023-01-08T06:36:28+5:302023-01-08T06:36:48+5:30
दोनपैकी एका गुन्ह्यातून दंडाधिकाऱ्यांनी शिल्पाला दोषमुक्त केले.

सार्वजनिक कार्यक्रमात घेतलेल्या चुंबनप्रकरणी खटला रद्द करण्यासाठी शिल्पा शेट्टी उच्च न्यायालयात
मुंबई : हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे याने २००७ मध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात घेतलेल्या चुंबनप्रकरणी सुरू असलेला खटला रद्द करण्यात यावा, यासाठी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने उच्च न्यायालयात धाव घेतली. शिल्पावर अश्लीलता व असभ्यतेचा आरोप करण्यात आला होता.
१५ एप्रिल २००७ रोजी दिल्ली बाहेरील संजय गांधी ट्रान्सपोर्टनगर येथे एड्स जनजागृती मोहिमेदरम्यान शिल्पा शेट्टी रिचर्ड गेरेला स्टेजवर नेत असताना त्याने तिचा हात पकडून घट्ट मिठी मारली आणि तिच्या गालाचे चुंबन घेतले. या घटनेमुळे वाद निर्माण झाला. शिल्पारोधात गुन्हा दाखल करण्यात आला. २०११ मध्ये शिल्पाने सर्व गुन्हे एकत्र करून मुंबईत वर्ग करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने दोन गुन्हे एकत्र करत मुंबईच्या न्यायालयात वर्ग केले.
दोनपैकी एका गुन्ह्यातून दंडाधिकाऱ्यांनी शिल्पाला दोषमुक्त केले. मात्र, एका गुन्ह्यातून दोषमुक्त करण्यास नकार दिला. दुसऱ्या प्रकरणात दोषमुक्ततेची तरतूद नसल्याचे कारण दंडाधिकाऱ्यांनी दिले. या निर्णयाला शिल्पाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शिल्पाचे वकील मधुकर दळवी यांनी न्या. आर. जी. अवचट यांच्या एकलपीठापुढे युक्तिवाद केला. दळवी यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारसह जयपूर येथील तक्रारदार पूनमचंद भंडारी यांना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.