"आई-वडील विभक्त झालेल्या घरातील मुलं...", रेणुका शहाणेंनी सांगितला बालपणीचा 'तो' कटू अनुभव, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:09 IST2025-10-06T10:03:12+5:302025-10-06T10:09:10+5:30
"आई-बाबांचा घटस्फोट झाला अन् आम्ही..." रेणुका शहाणेंनी सांगितला बालपणीचा अनुभव, म्हणाल्या...

"आई-वडील विभक्त झालेल्या घरातील मुलं...", रेणुका शहाणेंनी सांगितला बालपणीचा 'तो' कटू अनुभव, म्हणाल्या...
Renuka Shahane:बॉलिवूडसह मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे रेणुका शहाणे. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने आणि निखळ हास्याने त्यांनी सर्वांनाच भुरळ पाडली. रेणुका यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं आहे. चित्रपटांसह त्यांनी छोट्या पडद्यावरील 'सुरभी' मालिकेमध्ये काम करुन त्यांनी छोटा पडदा गाजवला. दरम्यान, रेणुका शहाणे त्यांच्या चित्रपटांसह स्पष्ट वक्तेपणासाठी देखील ओळखल्या जातात. त्यात आता त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत बालपणीच्या अनुभवांविषयी उघडपणे सांगितलं आहे.
नुकतीच रेणुका शहाणे यांनी 'अमुक तमुक'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, रेणुका यांनी बालपणीच्या आठवणी सांगितल्या. त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यामुळे लोकांकडून त्यांना कसे अनुभव आले, तसेच समाजाचा घटस्फोटित महिलेकडे बघण्याचा त्याकाळी कसा दृष्टिकोन होता? यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, "मी ८ वर्षांची असेपर्यंत आई, बाबा आणि आम्ही सगळीकडे फिरत होतो, कारण बाबा नेव्हीमध्ये अधिकारी होते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी राहिलो आणि ते तसंच सुरू राहिलं असतं. पण, माझे आई-बाबा विभक्त झाले, त्यामुळे आम्ही मुंबईत आलो आणि आईच्या आईकडे शिवाजी पार्कमध्ये राहायला लागलो, तो एक काळ वेगळा होता."
त्यानंतर पुढे त्या म्हणाल्या,"आई आणि बाबांचा घटस्फोट झाल्यामुळे आम्ही वेगळे होतो. लोकांसाठी आम्ही फार विचित्र होतो की, हे कसं काय होऊ शकतं? कारण त्यावेळी घटस्फोट ही कल्पनाच फार नवीन होती. त्यावेळी माझ्या आईबद्दल लोकांची फार चांगली मतं नव्हती. माझ्या मैत्रिणींचे जे आई-वडील होते त्यांना असं वाटायचं की, कसं काय अशी एक स्त्री असू शकते,जी एकल पालकत्व करतेय. त्यावेळी बाबा अधून-मधून आम्हाला भेटायला यायचे, त्यांचं आणि आईचं नातं सुंदर होतं."
रेणुका शहाणे आई-वडिलांच्या नात्याबद्दल म्हणाल्या...
मग पुढे रेणुका शहाणे आई-वडिलांच्या नात्याबद्दल म्हणाल्या,"अनेक लग्न झालेली जोडपी आहेत जी फक्त एकत्र आयुष्य काढातात. त्यांच्यापेक्षा चांगले मित्र हे माझे आई-वडील होते. त्यामुळे कधी तुम्ही एकत्र नवरा बायको नाही राहू शकत. लग्नानंतर नवरा-बायको म्हणून तुमच्या अपेक्षा वेगळ्या असू शकतात. पण मित्र-मैत्रीण म्हणून तुम्ही राहूच शकता आणि एकमेकांचा आदरही करु शकता.त्यांनी आयुष्यभर ते नातं जपलं. त्याचा आम्हाला खूप सपोर्ट मिळाला. कारण, त्यांच्यामध्ये चिडचिड, वाद हे सगळं जर आम्ही पाहिलं असतं तर आमचं बालपण कलुषित झालं असतं असं मला वाटतं.पण इकडे हा मुद्दाच नव्हता. इथे हा मुद्दा होता की बाहेरचे लोक ठरवत होते की हे त्यांच्या घरात कसे आनंदी राहु शकतात. आपण त्यांना कसा त्रास देऊ शकतो, असं ते करायचे. कारण, त्यांच्या मते हे असं उदाहरण समाजासमोर नसलं पाहिजे." अशा प्रतिक्रिया त्यांनी मुलाखतीमध्ये दिली.