करिअरमधील पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकाने नाकारलं; भूमिकेसाठी झोपडपट्टीत राहिला अभिनेता अन्; खुलासा करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 10:30 IST2025-11-20T10:21:52+5:302025-11-20T10:30:09+5:30
दिग्दर्शकाने नाकारलं, तरीही डगमगला नाही; झोपडपट्टीत राहून अभिनेत्याने केलेली ऑडिशनची तयारी, अभिनेत्याचा संघर्ष डोळे पाणावणारा

करिअरमधील पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकाने नाकारलं; भूमिकेसाठी झोपडपट्टीत राहिला अभिनेता अन्; खुलासा करत म्हणाला...
Vivek Oberoi: आपल्या चार्मिंग लू्क आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे विवेक ओबेरॉय. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. साथियां, कंपनी, शूटआऊट अॅट लोखंडवाला या चित्रपटांमधील त्याच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. विवेक ओबेरॉयला त्याच्या २२ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चढउतारांचा सामना करावा लागला.त्यावेळी त्याने सिनेविश्वापासून दूर जात व्यवसायाला प्राधान्य दिलं. एक उत्तम अभिनेता असण्यासोबत विवेक एक यशस्वी उद्योजक म्हणूनही ओळखला जातो. लवकरच मस्ती-४ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
विवेक ओबेरॉयने २००२ मध्ये मनोरंजनविश्वात पदार्पण केलं होतं.मात्र, करिअरमधील पहिल्याच चित्रपटासाठी तारेवरची कसरत करावी लागली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या कारकिर्दीतील संघर्षांवर आणि अनुभवांवर प्रकाश टाकला. अलिकडेच पिंकविलाच्या मुलाखतीत त्याला राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली, याबद्दल विचारण्यात आलं. या मुलाखतीत विवेक ओबेरॉयने सांगितलं, जवळपास दोन वर्ष ऑडिशन दिल्यानंतरही मला नकार मिळत होता पण मी सातत्याने प्रयत्न करत होतो.
विवेक ओबेरॉयला राम गोपाल वर्मांच्या कंपनी चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला.मात्र, सुरुवातीला भूमिकेसाठीही पहिल्यांदा विवेकला रिजेक्ट करण्यात आलं होतं. राम गोपाल वर्माने विवेकला या भूमिकेसाठी नकार दिला होता. तो कास्टिंगचा किस्सा सांगताना अभिनेता म्हणाला, "रामूजी मला भेटले आणि म्हणाले की तू खूपच सुशिक्षित आणि चॉकलेट बॉय दिसतोस. खरंतर ही एक गॅंगस्टार फिल्म आहे आणि तू या भूमिकेशी मॅच होत नाहीस.
त्यानंतर विवेक घरी परतला नाही. त्याऐवजी त्याने राम गोपाल वर्माच्या ऑफिसजवळील झोपडपट्टीत एक खोली भाड्याने घेतली आणि तीन आठवडे तिथे राहून स्थानिक लोकांचे निरीक्षण केलं. त्याबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला, "त्यानंतर मी राम गोपाल वर्मा यांना म्हणालो, मला एक संधी द्या. मी सहा-सात आठवडे झोपडपट्टीत राहिलो. तिथे मी एक खोली भाड्याने घेतली.रात्रीच्या वेळी मोठे उंदीर आत यायचे. ड्रममधून पाणी काढावे लागायचे. बाथरूम नव्हतं. शिवाय सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागायचा.त्यावेळी चंदू नागरेचं आयुष्य कसे असेल हे मला जाणवलं." त्यानंतर त्या गॅंगस्टारच्या लूकमध्ये विवेक त्यांच्यासमोर गेला आणि ऑडिशन दिली. त्यानंतर कंपनी सिनेमासाठी त्याची निवड झाली.