एकेकाळी सिम कार्ड विकले, कॉल सेंटरमध्ये केली नोकरी; बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला संघर्षकाळ, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:32 IST2025-11-10T15:28:19+5:302025-11-10T15:32:36+5:30
सिम कार्ड विकले, पोटासाठी कॉल सेंटरमध्ये केलं काम! बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला संघर्षकाळ

एकेकाळी सिम कार्ड विकले, कॉल सेंटरमध्ये केली नोकरी; बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला संघर्षकाळ, म्हणाला...
Vijay Verma: हिंदी चित्रपटसृष्टीत काम मिळण्यासाठी नशीब असावे लागते असे म्हटले जाते. पण, जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्यांनाही या इंडस्ट्रीने तारलं आहे, हे देखील तितकंच खरं आहे. असाच एक इंडस्ट्रीमधला अभिनेता आहे, ज्याने एक वेळचं अन्न मिळावं यासाठी प्रचंड संघर्ष केला. वेळप्रसंगी त्याने सिम कार्ड विकले, कॉल सेंटरमध्ये काम केलं. पण आता तो बॉलिवूडचा स्टार बनला आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या अभिनेत्याबद्दल....
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत यशाचं उंच शिखर गाठणारा हा अभिनेता म्हणजे विजय वर्मा . गल्ली बॉय, डार्लिग्ज तसेच दहाड यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची दखल घ्यायला भाग पाडलं. अलिकडेच रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्याने डिप्रेशन, रिलेशनशिप आणि पडत्याकाळाविषयी मोकळेपणाने चर्चा केली. या मुलाखतीत, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी पडेल ते काम केलं, वेगवेगळे कोर्स पूर्ण केले, कारण पैसा कमवायचा होता, असं विजयने सांगितलं. मात्र, अभिनयाची आवड त्याला शांत बसू देत नव्हती. रिया चक्रवर्तीला दिलेल्या या मुलाखतीत संघर्ष काळातील आठवणींना उजाला देत अभिनेता म्हणाला," मी जवळपास ५ वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स केले आहेत. इतकंच नाही सॉफ्टवेअर मॅनेजर, इव्हेंट मॅनेजमेन्टचं देखील शिक्षण घेतलंय. मी बी.कॉम केल्यानंतर बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. पण, काहीच घडलं नाही. "
सिमकार्ड विकले अन्...
त्या संघर्षकाळाबद्दल बोलताना विजय पुढे म्हणाला, "मी तीन महिने कॉल सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतलं, पण त्यातही मन लागत नव्हतं. शिवाय मी एका मोबाईल कंपनीमध्येही काम केलं, सिमकार्ड विकले. यासाठी मी रोज ३०-४० किलोमीटर इतका प्रवास बाईकने करायचो. कोणताही सीझन असो माझं काम चालूच असायचं. माझा जन्म एका मारवाडी कुटुंबात झाल्याने माझ्या घरच्यांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं. परंतु, हे सगळं करणं माझ्यासाठी कठीणच होतं. त्यावेळी काम करताना प्रत्येकाला टार्गेट दिले जायचे. पण, माझे फक्त ३ टार्गेट पूर्ण व्हायचे. यावरून मला अनेकदा बॉसचा ओरडा बसायचा. त्याचं मला फार वाईट वाटायचं. एकेदिवशी मी त्यांना सांगितलं होतं की, कधी ना कधी तुमच्या शोरूमवर माझा फोटो नक्कीच झळकले. आणि मी या ब्रॅंडचा ब्रॅंड अॅम्बॅसिडर बनेन आणि तसंच घडलं." दरम्यान, अभिनेत्याचा हा संघर्ष अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
विजय वर्माच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अलिकडेच तो नेटफ्लिक्स सीरिज 'IC814' मध्ये दिसला. सध्या तो त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे.