बॉलिवूडच्या तीन अभिनेत्री आमने सामने, कोणाच्या चित्रपटाला मिळणार प्रेक्षकांची पसंती ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 16:54 IST2022-11-03T16:48:40+5:302022-11-03T16:54:01+5:30

कोरोनानंतर सिनेसृष्टी पुर्वपदावर येताना दिसत आहे असे म्हणायला हरकत नाही. एकापाठोपाठ एक ब्लॉकबस्टर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. विशेष म्हणजे महिलाप्रधान सिनेमांची चलती आहे.

biggest clash at box office among three bollywood stars | बॉलिवूडच्या तीन अभिनेत्री आमने सामने, कोणाच्या चित्रपटाला मिळणार प्रेक्षकांची पसंती ?

बॉलिवूडच्या तीन अभिनेत्री आमने सामने, कोणाच्या चित्रपटाला मिळणार प्रेक्षकांची पसंती ?

कोरोनानंतर सिनेसृष्टी पुर्वपदावर येताना दिसत आहे असे म्हणायला हरकत नाही. एकापाठोपाठ एक ब्लॉकबस्टर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. विशेष म्हणजे महिलाप्रधान सिनेमांची चलती आहे. आता हेच बघा येत्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड अभिनेत्रींचाच बोलबोला बघायला मिळणार आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफ हिचा फोन भूत, जान्हवी कपूरचा मिली आणि सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशीचा डबल एक्सएल हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. बॉलिवूडमधील अग्रगण्य अभिनेत्री बॉक्स ऑफिसवर एकमेकांचा सामना करताना दिसणार आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीला कॅट फाईट काही नवीन नाही. दोन अभिनेत्रींचे एकमेकींशी पटले तर नवलच. परंतु ही फाईट सिनेमा सोडून इतर विषयांवरुनच जास्त दिसून येते. येत्या शुक्रवारी तिनही चित्रपटात अभिनेत्रींचाच गाजावाजा आहे. फोन भूत, मिली आणि डबल एक्सएल यापैकी कोणत्या चित्रपटाला प्रेक्षक पसंती देतात हे बघणे इंटरेस्टींग असेल. सध्या हे तिघेही सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

फोन भूत हा एक हॉरर कॉमेडी असणार आहे. सिनेमात अभिनेत्री कॅटरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर हे मुख्य भुमिकेत आहेत. यामध्ये कॅटरिना भुताच्या भुमिकेत बघायला मिळणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. कॅटरिना कैफचा चाहतावर्ग तर मोठा आहेच तर दुसरीकडे सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर यांनी देखील आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.

यासोबतच शुक्रवारी अभिनेत्री जान्हवी कपूरचा मिली हा सिनेमा प्रदर्शित होतोय. मिली हा मल्याळम चित्रपट हेलेन चा रिमेक आहे. मिली मध्ये जान्हवीसोबतच सनी कौशलही मुख्य भुमिका करताना दिसणार आहे. हा एक थरारक सिनेमा असणार आहे. जान्हवी कपूरचे सोशल मीडियावर मिलीयन फॉलोअर आहेत मात्र अजून तिला बॉक्स ऑफिसवर अद्याप म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे जान्हवीसाठी हा चित्रपट नक्कीच महत्वाचा आहे.

तर याच दिवशी डबल एक्सएल हा सिनेमाही रिलीज होत आहे. या सिनेमात तर दोन अभिनेत्री स्क्रीन शेअर करत आहेत. सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. बॉडी शेमिंग वरुन महिलांना नेहमीच टार्गेट केले जाते. हाच विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. सोनाक्षी सिन्हा मोठ्या कालावधीनंतर पडद्यावर दिसणार आहे. तर हुमा कुरेशीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. 

आता या तीनही सिनेमांपैकी कोणता चित्रपट हिट होतो याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: biggest clash at box office among three bollywood stars