'डॉन ३'बद्दल मोठी अपडेट! फरहान अख्तरने सांगितली रणवीरच्या बहुप्रतीक्षित सिनेमाच्या शूटिंगची तारीख
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 17:52 IST2025-11-27T17:52:01+5:302025-11-27T17:52:31+5:30
Ranveer Singh's 'Don 3' Movie : रणवीर सिंगचा आगामी चित्रपट 'डॉन ३'ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाशी संबंधित एक मोठी अपडेट फरहान अख्तरने दिली आहे.

'डॉन ३'बद्दल मोठी अपडेट! फरहान अख्तरने सांगितली रणवीरच्या बहुप्रतीक्षित सिनेमाच्या शूटिंगची तारीख
रणवीर सिंगच्या 'डॉन ३' सिनेमाची चाहते खूप दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. अखेर फरहान अख्तरने या आगामी चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने 'डॉन ३'चे शूटिंग कधी सुरू होणार हे सांगितले आहे. अभिनेता-चित्रपट निर्माता फरहान सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या '१२० बहादूर' या चित्रपटाचा आनंद घेत आहेत.
'फिल्मफेअर'शी संवाद साधताना फरहान अख्तरने 'डॉन ३'च्या शूटिंगबद्दल खुलासा केला. तो म्हणाला की, "आम्ही पुढील वर्षी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करू. कदाचित हीच सर्वात मोठी अपडेट आहे, जी मी तुम्हाला देऊ शकेन." यापूर्वी, 'डॉन ३'चे निर्माते सप्टेंबर २०२५ मध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याची योजना आखत होते. मात्र, काही कारणांमुळे ते पुढे ढकलण्यात आले होते.
रणवीर सिंग आणि विक्रांत मेस्सी यांच्यात होणार टक्कर
'डॉन ३' हा सर्वाधीक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. यावेळी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्याऐवजी रणवीर सिंग 'डॉन'च्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या तिसऱ्या फ्रँचायझीमध्ये, रणवीर सिंगची लढत विक्रांत मेस्सी सोबत होणार आहे. विशेष म्हणजे, 'दिल धडकने दो' नंतर रणवीर आणि विक्रांत पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. या दोघांनी २०१३ मध्ये विक्रमादित्य मोटवानेच्या 'लुटेरा'मध्ये देखील एकत्र काम केले होते. मात्र, ते पडद्यावर एकमेकांसोबत लढताना दिसण्याची ही पहिलीच वेळ असेल. न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने आधी सांगितले होते, "नक्कीच, या दोघांमध्ये बाइक चेससह अनेक स्टायलिश ॲक्शन सीक्वेन्स असतील. विक्रांत 'डॉन ३'मध्ये एका अगदी नवीन अवतारात दिसेल, ज्यामुळे चाहतेही थक्क होतील."
कियाराच्या जागी दिसणार क्रिती सनॉन?
सुरुवातीला, 'डॉन ३'मध्ये रणवीर सिंगसोबत मुख्य भूमिका साकारण्यासाठी कियारा अडवाणीला साईन करण्यात आले होते. मात्र, लेटेस्ट रिपोर्ट्सनुसार, ती या प्रोजेक्टमधून बाहेर पडली आहे आणि तिच्या जागी आता क्रिती सनॉन दिसणार आहे. मात्र, निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.