सुशांत सिंह राजपूत प्रकरणी रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, ५ वर्षांनी मिळाला पासपोर्ट! म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 13:04 IST2025-10-04T12:57:27+5:302025-10-04T13:04:49+5:30
"असंख्य लढाया अन्...", सुशांत सिंह राजपूत प्रकरणी रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, ५ वर्षांनी मिळाला पासपोर्ट

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, ५ वर्षांनी मिळाला पासपोर्ट! म्हणाली...
Rhea Chakraborty : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १२ जून २०२० मध्ये त्याच्या राहत्या घरी आत्महत्या करत जीवन संपवलं. त्याच्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. या घटनेला आता जवळपास पाच वर्षे झाली आहेत. दरम्यान,या प्रकरणी रिया चक्रवर्ती हे नाव चर्चेत आलं. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रियाला तरुंगात जावं लागलं होतं, तिच्यावर गंभीर आरोपही करण्यात आले होते. अशातच काही दिवासांपूर्वी सीबीआयने याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आणि तिला क्लिन चीट मिळाली. त्यात आता अभिनेत्रीला या प्रकरणात आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू संबंधित ड्रग्ज प्रकरणात रियाला अटक केली असतानाच तिचा पासपोर्ट सुद्धा जप्त करण्यात आला होता.त्यामुळे न्यायालयाच्या परवानगीशिवाय तिला देशाबाहेर जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे अभिनेत्रीला अनेक प्रोजेक्ट गमवावे लागले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा मिळाला आहे. अखेर ५ वर्षांनी न्यायालयाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ला अभिनेत्रीचा पासपोर्ट परत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर खास पोस्ट लिहून अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर हातात पासपोर्ट घेत खास फोटो शेअर केला आहे. त्याला लक्षवेधी कॅप्शन देत तिने म्हटलंय,"गेल्या ५ वर्षांपासून धैर्य हा माझा एकमेव पासपोर्ट होता. असंख्य लढाया, न संपणारी आशा. आज पुन्हा एकदा माझ्या हातात माझा पासपोर्ट आहे. माझ्या आयुष्यातील दुसऱ्या अध्यायासाठी तयार आहे." तसंच पोस्टच्या शेवटी 'सत्यमेव जयते' असंही तिने लिहिलं आहे.
रियाचे वकील काय म्हणाले...
दरम्यान, न्यायालयात रियाच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, रियाने सर्व अटींचं पालन केलं आहे. तिने कधीही न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केले नाही. तिला व्यवसायामुळे शूटिंग, ऑडिशनसाठी वारंवार परदेशात जावे लागतं. पासपोर्ट नसल्यामुळे अनेक प्रोजेक्ट तिच्या हातून निसटले. दरम्यान, असं असतानाही रिया चक्रवर्तीला प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहावं लागणार आहे. शिवाय देश सोडण्यापूर्वी चार दिवस आधी तिला प्रवासाचं वेळापत्रक कोर्टात सादर करणं गरजेचं आहे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.